बिहारमध्ये शाहरुख-दीपिकाविरोधात एफआयआर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
शाहरुख खान-दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटाला 7 राज्यांमध्ये तीव्र विरोध सुरू झाला आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि महाराष्ट्रात निदर्शने सुरू झाल्याने प्रदर्शनाला बंदी घालण्यात आली आहे. तसेच बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणसह पाच जणांवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आणि अश्लीलता पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्तीसगडमधील शिवसैनिकांनी चित्रपटातून ‘बेशरम रंग’ हे गाणे काढून टाकण्याची मागणी केली आहे. तसे न केल्यास हा चित्रपट छत्तीसगडमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. उत्तर प्रदेशमध्ये मथुरेत हिंदू महासभेचा या चित्रपटाला विरोध आहे. याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी घातली आहे. भगवा रंग हा हिंदू धर्माचे प्रतीक असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. दीपिकाच्या हय़ा पेहरावावर आक्षेप घेतल्याने चित्रपट वादात सापडला आहे.