स्थानिक नागरिकांचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांना निवेदन, अनेक समस्या भेडसावण्याची भीती
वार्ताहर /खोल
पारयेमळ, खोल येथे फिश मिलसाठी जागा तयार करण्यात येत असून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. यामुळे या भागातील ग्रामीण लोकवस्तीला पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावण्याची तसेच दूषित पाणी व आरोग्याला अपायकारक गोष्टींची बाधा पोहोचण्याची भीती व्यक्त करून सदर प्रकल्पाविरुद्ध खोल पंचायत क्षेत्रातील पारयेमळ, आमडे, कुडय, कारेगाळ, साळेरी व अन्य भागातील नागरिकांनी पारयेमळ येथे केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांना निवेदन सादर केले .गावच्या पर्यावरणाची हानी करणाऱ्या व आरोग्याला अपायकारक असलेल्या कोणताही प्रकल्पास आपण समर्थन देणार नाही. कोणताही प्रकल्प उभा राहताना त्याची शहानिशा करून व लोकमताचा आदर करूनच निर्णय घेणे क्रमप्राप्त आहे. आपण नेहमीच लोकांसमवेत राहणार असल्याचे आमदार डिकॉस्ता यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
सरपंच कृष्णा वेळीप यांनी या प्रकल्पाविषयी आपणास कोणतीही माहिती नसून या प्रकल्पाची जागा बार्से पंचायत क्षेत्रात असल्याचे समजले होते, असे सांगितले. या पंचायतीत विचारपूस केली असता यासंदर्भात कोणताही पत्रव्यवहार झाला नसल्याचे सांगण्यात आले. या प्रकल्पामुळे खोल पंचायत क्षेत्रातील नागरिकांना त्रास होणार असतील, तर आपण सदैव नागरिकांच्या पाठीशी राहणार असल्याचे सरपंच वेळीप यांनी स्पष्ट केले. उपसरपंच पंढरी प्रभुदेसाई यांनीही लोकांसमवेत राहणार असल्याचे स्पष्ट करताना येथे एकत्र झालेल्या नागरिकांना या लढ्यात शेवटपर्यंत एकसंध राहण्याचे आवाहन केले.
यावेळी पायक वेळीप, माजी पंच नारायण वेळीप, श्रीनिवास नायक, रोझारियो गोयश, सुनील पागी, श्रीपाद कामत, महिमा वेळीप, सुकांती वेळीप, सुनीला वेळीप, भूषण खोलकर, विश्वेश्वर खोलकर, सिद्धार्थ खोलकर, विनिशा वेळीप, शैला वेळीप, मनोरजा वेळीप तसेच अन्य नागरिकांनी फिश मिलच्या विरोधात आपली मते मांडली. आमदार डिकॉस्ता यांच्यासमवेत सरपंच वेळीप, उपसरपंच प्रभुदेसाई यांच्याशिवाय पंच अजय पागी, तेजल पागी, प्रज्ञा कामत, प्रभाकर वैज उपस्थित होते. सूत्रसंचालन महेश्वर वेळीप यांनी केले. यावेळी प्रकल्पाच्या विरोधात नागरिकांनी आमदारांसमवेत फेरीही काढली.