भक्तांना सोयिस्कर : वातानुकूलित बससुविधा
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाच्या संकटानंतर सर्व प्रार्थनास्थळे खुली झाली आहेत. त्यामुळे पर्यटनाबरोबर धार्मिकस्थळांना भेट देणाऱया प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीखातर बेळगाव येथून तिरुपती तिरुमलला तात्काळ दर्शन पॅकेज टूर सुरू करण्यात येणार आहे. कर्नाटक राज्य पर्यटन विकास मंडळाने याला हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे बेळगावातूनदेखील टूर पॅकेजची नोंदणी करून तिरुपतीचे दर्शन घेता येणार आहे.
विशेषतः वातानुकूलित ऐरावत क्लब क्लास या बसच्या माध्यमातून भक्तांना प्रवास करता येणार आहे. शिवाय पार्किंग, पिकअप पॉईंट आणि इतर बाबतही चर्चा झाली आहे. शिवाय तिकीट बुकिंगसाठी बेळगाव वन कार्यालयात एक काऊंटर उपलब्ध करण्याची विनंती करण्यात आली आहे. पर्यटन विकास महामंडळाकडून बेंगळूर-तिरुपती तिरुमलला तात्काळ सेवा दर्शन पॅकेज टूरचे आयोजन केले जात आहे. त्याला विशेष प्रतिसाद मिळत आहे. या धर्तीवर बेळगाव, हुबळी आणि धारवाड येथूनदेखील तिरुपती तिरुमलला तात्काळ दर्शन पॅकेज टूर सेवा सुरू केली जाणार आहे.
बेळगाव, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून तिरुपतीला जाणाऱया भक्तांची संख्या अधिक आहे. ही पॅकेज टूर सुरू झाल्यास प्रवाशांचा प्रतिसाद मिळणार आहे. त्यामुळे येत्या काळात बेळगाव-तिरुपती तात्काळ दर्शन पॅकेज टूर कधी सुरू होणार, याकडेही लक्ष लागले आहे.