वृत्तसंस्था/ लाहोर
पाकिस्तान क्रिकेट मंडळाने पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कराची, लाहोर आणि रावळपिंडी ही ठिकाणे निश्चित केली आहेत. भारताचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी ‘हायब्रीड मॉडेल’ विचाराधीन असल्याची चर्चा सुरू झालेली असली, तरी ही स्पर्धा पाकिस्तानातच होईल यावर पीसीबीने जोर देणे कायम ठेवले आहे.
2017 मध्ये इंग्लंडमध्ये शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्यात आली होती, ती पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. भारताने अद्याप त्यात सहभागाची पुष्टी केलेली नाही आणि अशी अटकळ आहे की, आयसीसी ‘हायब्रीड मॉडेल’ वापरू शकते तसेच भारतीय संघाला पाकमध्ये जाण्यास सरकारी मंजुरी न मिळाल्यास त्यांचे सामने तटस्थ ठिकाणी आयोजित केले जाऊ शकतात. आयसीसीने आधीच स्पष्ट केले आहे की, ते कोणत्याही सदस्य राष्ट्राला त्यांच्या सरकारी धोरणाचे उल्लंघन करण्यास सांगणार नाहीत.
पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी लाहोर येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानमधील सामन्यांचे वेळापत्रक तयार करून पाठवले आहे. ‘आयसीसी’ची सुरक्षा टीम आली आणि आमची खूप चांगली बैठक झाली. त्यांनी येथील व्यवस्था पाहिली आहे आणि आम्ही त्यांना स्टेडियम सुधारणा योजनेची माहिती देखील देऊ. आम्ही पाकिस्तानमध्ये एक चांगली स्पर्धा आयोजित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत, असे ते म्हणाले. भारताला सामावून घेण्यासाठी या स्पर्धेच्या रचनेत कोणत्याही प्रकारे बदल केला जाणार नाही, असा मुद्दा पीसीबीकडून ठामपणे मांडला जात आहे. पण गेल्या वर्षी आशिया कपचे आयोजन करण्याच्या बाबतीत ‘हायब्रीड मॉडेल’ वापरण्यात आला होता.