इस्लामाबाद / वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) पाकिस्तानला 57 हजार कोटी रुपयांचे कर्ज नाकारल्याने जेरीस आलेल्या त्या देशाने आता या वित्तसंस्थेसमोर सपशेल नमते घेतले आहे. कर्ज देण्यासाठीच्या सर्व अटी मान्य करण्याचा निर्णय या देशाने घेतला असून वीजेवरचा कर वाढविण्यासही संमती दिली आहे. मात्र, अद्यापही या वित्तसंस्थेने त्याला कर्ज देण्यास सहमती दर्शविलेली नाही, अशी माहिती आहे.
पाकिस्तानची आर्थिक परिस्थित अत्यंत खराब असून इंधन, जीवनावश्यक धान्ये आणि वस्तू, साखर, स्वयंपाकाचा गॅस इत्यादी वस्तू प्रचंड महाग झाल्या असून अधिक किंमत देऊनही त्या कित्येकदा मिळत नाहीत, अशी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पाकिस्तानने नाणेनिधीकडे कर्जाची मागणी केली होती. नाणेनिधीचे एक दल पाकमध्ये सलग सात दिवस होते. मात्र, चर्चेत कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे नाणेनिधीचे प्रतिनिधी परत गेले. आता पाकिस्तानात पेट्रोल पंप कोरडे झाले असून लोकांच्यात प्रचंड असंतोष आहे. त्या असंतोषाचा भडका उडेल अशी भीती या देशाच्या राज्यकर्त्यांना वाटते. त्यामुळे आता नाणेनिधीच्या अटी मान्य करण्याची तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली.