जिल्हाधिकाऱ्यांकडून अटीशर्तीवर वाहतुकीस परवानगी, रात्रीची वाहतूक बंद, हलक्या वाहनांसाठी खेडकडे जाताना शेल्डी, चिपळूणकडे येताना चिरणीमार्गे पर्यायी मार्ग, पर्यायी मार्गाच्या निर्णयाने स्थानिकांत संताप
प्रतिनिधी/चिपळूण
गेल्या दहा दिवसांपासून सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट अखेर खुला करण्यात आला आहे. आजपासून ३० जुलैपर्यत अटीशर्तींवर केवळ अवजड वाहनांच्या एकेरी मार्गासाठी सुरू करण्यास जिल्हाधिकारी डॉ बी. एन. पाटील यांनी परवानगी दिलीय. मात्र सायंकाळी ७ नंतर घाट सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय हलक्या वाहनांना घाटातून प्रवेश न देता पर्यायी मार्गाने वळवण्याचे आदेश दिलेत. परिणामी जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानंतर स्थानिकांत मोठी असंतोष पसरला आहे.
दरम्यान, दीर्घकाळ घाट बंद असल्याने परशुराम देवस्थान, शाळा-महाविद्यालये, औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनी होत असलेल्या नुकसानीबाबत कळवल्यानंतर महामार्ग, पोलीस, परिवहन अधिकारी यांच्याकडून पाहणी करण्यात आली. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार गुरूवारी दुपारी जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी 30 जुलैपर्यत घाटातील वाहतुकीबाबतचे नवे आदेश दिले. यामध्ये घाटातील अवजड वाहनांच्या एकेरी वाहतुकीबाबतचे नियोजन उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड व चिपळूण, तसेच राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण आणि रत्नागिरी यांनी संयुक्तपणे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हे ही वाचा : आंजणीनजीक दरड कोसळून ठप्प झालेली कोकण रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरळीत
घाटातील प्रवासात दोन अवजड वाहनांमध्ये किमान 50 ते 100 मीटर इतके अंतर असावे. वाहनांचा वेग ताशी 20 ते 30 कि. मी. असावा. दरडप्रवणग्रस्त भागात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याठिकाणी आवश्यक साधनसामग्री व जबाबदार अधिकारी यांच्यासह पुरेसे मनुष्यबळ 24 तास मदत व बचावकार्यासाठी उपलब्ध ठेवण्यात यावेत. आवश्यक त्या उपाययोजनांसह घाट बंदबाबत स्थानिक भागासह पनवेल, सिंधुदुर्ग, गोवा व कोल्हापूर याठिकाणी व्यापक प्रसिध्दी द्यावी. घाटातील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने मुंबईवरुन येणारी जास्तीत जास्त वाहने, पनवेलवरुन मुंबई-पुणे महामार्गावरून तसेच गोव्यावरून येणारी वाहने पाली येथून रत्नागिरी कोल्हापूर-मुंबई यामार्गे वळवण्यात यावीत यादृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिल्या आहेत.