नवजागृती संघाच्या उपक्रमाचे कौतुक : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत पालकवर्गात जागृती
वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी खुर्द येथील नवजागृती सेवा संघ व शिक्षणप्रेमी नागरिकांच्यावतीने विद्यार्थी सर्वांगीण विकास व जागृती असा आगळा वेगळा पालक मेळावा येथील मराठी प्राथमिक शाळेमध्ये पालक, लोकप्रतिनिधी व शाळा सुधारणा कमिटी सदस्य यांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल, यासंबंधी चर्चा करून तसेच पालकवर्गात जागृती करून उपाययोजना करण्याचे ठरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवजागृती संघाचे अध्यक्ष टी. डी. पाटील होते. प्रारंभी वर्षभरात दिवंगत झालेले संघाचे सदस्य, गुऊजन व पालक यांना दोन मिनिटे शांतता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रार्थनेनंतर निवृत्त मुख्याध्यापक पुंडलिक पाटील यांनी प्रास्ताविकमध्ये संघाच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती दिली. मुख्याध्यापक पी. एच. पाटील यांनी सरकारी शाळेतील पटसंख्यावाढ, बी. डी. मोहनगेकर यांनी स्पर्धा परीक्षातील यश, निवृत्त मुख्याध्यापक पी. डी. पाटील यांनी क्रीडा क्षेत्रासंबंधी, जोतिबा पाटील यांनी पालकांची जबाबदारी व कर्तव्ये, मुख्याध्यापक एस. व्ही. जाधव यांनी शासकीय योजनांची माहिती दिली. डाएटच्या अधिकारी भारती पाटील (दासोग मॅडम), अॅड. एम. जी. पाटील, जि. पं. माजी सदस्या सरस्वती पाटील, परशराम बुवा, मुख्याध्यापक ए. बी. कोलकार आदींनी मनोगते व्यक्त करताना नवजागृती संघाच्या उपक्रमाचे कौतुक केले. सरकारी शाळांचा क्रीडा व बौद्धिक दर्जा वाढविण्यासाठी सुरू असलेल्या शैक्षणिक कार्याला सहकार्य करून आपल्या पाल्यांची प्रगती साधण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात टी. डी. पाटील यांनी आपल्या शाळेची गुणवत्ता वाढवल्याने पटसंख्या वाढेल, असे सांगितले.
गुणी विद्यार्थ्यांचा गौरव
यावेळी 2022 च्या वार्षिक परीक्षेत सातवीत प्रथम आलेल्या चार विद्यार्थ्यांचा ज्येष्ठ सदस्य पुंडलिक पाटील यांच्यावतीने रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. 2023 मधील पहिली ते सातवीच्या प्रथम तीन क्रमांकांना नवजागृती संघाच्यावतीने रोख बक्षिसे देऊन गौरविण्याचे जाहीर करण्यात आले. पाटील मॅडम यांच्यावतीने तिसरी, पाचवी व सातवीसाठी इंग्रजी पाठांतर स्पर्धा आयोजित करून बक्षिसे देण्याचे जाहीर केले.
कार्यक्रमाला शाळा सुधारणा अध्यक्ष बाबू पावशे, उपाध्यक्षा सुनीता पाटीलसह सर्व सदस्य, ग्रा. पं. सदस्य मीना मुतगेकर, वीणा पुजारी, कल्लाप्पा जाधव, पालकवर्ग व शिक्षणप्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षणप्रेमी दिनेश मुतगेकर, प्रकाश पाटील, मोहन जाधव यांच्यासह संघाच्या सभासदांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन निवृत्त मुख्याध्यापक पी. वाय. पाटील यांनी केले. आभार पी. बी. मास्तीहोळी यांनी मानले.