कोल्हापूर प्रतिनिधी
शाही दसरा महोत्सवात रविवारी (22 ऑक्टोबर) अनेक कार्यक्रमांची रेलचेल आहे. फन स्ट्रीटची मजा, रचना शिल्प प्रात्यक्षिक तसेच गालिचा रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून शाही दसरा महोत्सवानिमित्त होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
रविवारी सकाळी 8 ते 11 यावेळेत दसरा चौक ते जयंती पुल रस्ता हा फन स्ट्रीटवर जुने खेळ, आट्या पाट्या, गलोर, गोट्या, भोवरा, गाणी, चित्र, मार्शल आर्ट, मर्दानी खेळ, गो कारटिंग, महिलांसाठी लेझीम आदी मजा घ्यायला मिळेल. 22 ते 24 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत महावीर कॉलेज ते खानविलकर पेट्रोल पंप मार्गावर रचना शिल्प प्रात्यक्षिक व स्पर्धा होणार आहे.
कोल्हापूर शाही दसरा महोत्सवात भव्य रांगोळी स्पर्धा
कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवात दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी महाद्वार रोड येथे भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. नवरात्रोत्सवात अष्टमी दिवशी 22 ऑक्टोबरला अंबाबाई देवीची नगर प्रदक्षिणा आहे. रांगोळ्या, फुला पानांच्या पाकळ्यांनी हा प्रदक्षिणा मार्ग दरवर्षी सजविला जातो. यंदा कोल्हापूरचा शाही दसरा हा आधिक व्यापक व भव्य होण्यासाठी गालिचा रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे नियम व अटी
ही स्पर्धा 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.30 ते सायं 6 वाजेपर्यंत असेल. गालीचा रांगोळीत फक्त रंग व रांगोळी व फुलांचा वापर करणे बंधनकारक आहे. मूर्ती किंवा तत्सम वस्तूंचा वापर करता येणार नाही.स्पर्धक वैयक्तिक व सामूहिक सहभाग नोंदवू शकतात. समूहातली संख्या 6 पेक्षा जास्त असू नये. रांगोळी व इतर साहित्य हे स्पर्धकांनी स्वत? आणायचे आहे. रांगोळी स्थळृ ताराबाई रोड (महाद्वार रोड ते सरस्वती थिएटर) असे असेल. स्पर्धकांनी दुपारी दोन वाजेपर्यंत हजर राहावे. स्पर्धा परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. नोंदणी झालेल्या स्पर्धकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.काही शंका असल्यास संपर्क क्रमांक कविता बंकापुरे- मोबाईल क्रमांक -8623848293, 8605400746 यावर संपर्क साधावा. दुपारी 2 नंतर आलेल्या स्पर्धकांचा विचार केला जाणार नाही, यासाठी सहभागी होवू इच्छिणाऱ्यांनी वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन दसरा महोत्सव संयोजन समितीने केले आहे.