दिगंबर कामत, मायकल लोबो यांची मागणी : पाटकर याचिका दाखल करण्यास पात्र नाही,आमदार फुटीरता नियम 1986 चा दिला संदर्भ
पणजी : गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी सादर केलेली अपात्रता याचिका रद्द करून फेटाळून लावावी, असे उत्तर आमदार दिगंबर कामत व आमदार मायकल लोबो यांनी सभापती रमेश तवडकर यांना दिले आहे. कामत व लोबो या दोघांनी ते काँग्रेस पक्षात असताना आणि भाजपात जाण्यापूर्वी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून त्यांना अपात्र ठरवावे, अशी याचिका अमित पाटकर यांनी सभापती रमेश तवडकर यांच्यासमोर सादर केली होती. त्यावर उत्तर देण्याची नोटीस सभापतींनी लोबो व कामत यांना बजावली होती.
अमित पाटकर आमदार नाही
त्यावर उत्तर देताना ते दोघे म्हणतात की, एक आमदारच दुसऱ्या आमदाराच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल करू शकतो. त्यासाठी त्यांनी अपात्रता फुटीरता नियम 1986 चा संदर्भ दिला असून त्या नियमाप्रमाणे अपात्रता याचिका दाखल करणारे पाटकर हे आमदार नाहीत. त्यामुळे ते अशा प्रकारची याचिका सादर करू शकत नाहीत, त्यांनी सादर केलेली याचिका कायदेशीर नाही, असा दावा लोबो व कामत यांनी उत्तरातून केला आहे. याचिका फेटाळून लावण्यासाठीचे हे एक उत्तम उदाहरण असल्याचेही नमूद केले आहे. त्यामुळे पाटकर यांची याचिका फेटाळली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान अपात्रता याचिकेसंदर्भात उच्च न्यायालय आदेश देऊ शकत नाही, कारण सभापतीपद हे घटनात्मक आहे, असे स्पष्टीकरण खुद्द सभापती रमेश तवडकर यांनी दिल्यानंतर लोबो-कामत यांनी त्यापासून प्रेरणा घेऊन सदर प्रत्युत्तर सादर केल्याचे सुत्रांनी सांगितले.
आठ आमदारांचे अद्याप उत्तर नाही
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात गोवा प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आठ फुटीर आमदारांविरोधात सादर केलेली अपात्रता याचिका न्यायप्रविष्ट असून तेथे फक्त सभापती रमेश तवडकर यांनी उत्तर सादर केले आहे. फुटीर आमदारांना खंडपीठाने नोटीस बजावून उत्तर देण्यास बजावले होते परंतु, अजून एकही फुटीर आमदाराने तेथे उत्तर सादर केलेले नाही, अशी माहिती हाती आली आहे. त्याची सुनावणी 5 मार्च रोजी असून अद्याप फुटिरांकडे 5 दिवसांची मुदत उत्तर देण्यासाठी बाकी आहे. त्यांच्या उत्तरावरच उच्च न्यायालयातील याचिकेचे भवितव्य अवलंबून आहे.