क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
एमसीसीसी स्पोर्ट्स क्लब आयोजित वेवकोटा चषक 13 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात फिनिक्स संघाने चॅलेंजर्स निपाणी संघाचा 49 धावांनी तर चॅलेंजर्स निपाणी संघाने एमसीसीसी संघाचा 78 धावांनी पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले. झियॉन व प्रथमेश यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
फिनिक्स स्कूलच्या मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात फिनिक्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 गडी बाद 142 धावा केल्या. त्यात झियॉनने 41, सर्वज्ञाने 39 तर सिद्धांतने 25 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना चॅलेंजर्स निपाणी संघाचा डाव 18.3 षटकात सर्व गडी बाद 93 धावात आटोपला. त्यात साईराजने 54 धावा केल्या. फिनिक्सतर्फे सिद्धांत व नित्या यांनी प्रत्येकी 3 तर झियॉन आणि सर्वज्ञा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात चॅलेंजर्स निपाणी प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 गडी बाद 140 धावा केल्या. त्यात प्रथमेशने 52, साईराजने 22 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना एमसीसीसी संघाचा डाव 17 षटकात 62 धावात आटोपला. त्यात जुनेदने 14 धावा केल्या.