दुसऱया दिवशीची दुर्गामाता दौड : सजीव देखाव्यांवर भर : भल्या मोठय़ा रांगोळय़ा-फुलांच्या वर्षावाने दौडचे स्वागत
प्रतिनिधी /बेळगाव
नयनरम्य सजावट आणि सजीव देखावे हे अनगोळ व टिळकवाडी येथील दुर्गामाता दौडचे वैशिष्टय़. दुसऱया दिवशीच्या दौडमध्ये आकर्षक सजावटीमुळे नवचैतन्य पसरले. आई भवानी, जगदंबेचा जयजयकार करत हजारो तरुण दुर्गामाता दौडमध्ये सहभागी झाले होते. भल्या मोठय़ा रांगोळय़ा आणि फुलांचा वर्षाव करत केलेले दौडचे स्वागत लक्षणीय ठरले.
दुसऱया दिवशीच्या दुर्गामाता दौडला शिवाजी कॉलनी, टिळकवाडी येथील शिवमूर्तीपासून प्रारंभ झाला. सामाजिक कार्यकर्ते वीरेश हिरेमठ यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. टिळकवाडी येथून आरपीडी चौकमार्गे अनगोळमध्ये दौड मार्गस्थ झाली. हरिमंदिरपासून दौडचे भव्य स्वागत करण्यात येत होते. अनगोळमधील प्रत्येक गल्ल्यांमध्ये फुले, फुगे यांची सजावट करण्यात आली होती.
दौडच्या मार्गावर पोलिसांच्या श्वानपथकाद्वारे तपासणी केली जात होती. दोन दिवसात बेळगावमध्ये घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनगोळ येथील महालक्ष्मी मंदिरात दौडची सांगता झाली. ट्रफिकचे एसीपी शरणप्पा, सीपीआय सुनीलकुमार व सीपीआय दयानंद शेगुणशी यांच्या हस्ते ध्वज उतरवून आरती करण्यात आली. दुसऱया दिवशीच्या दौडमध्ये युवकांसह महिला-वयोवृद्धांची उपस्थिती सर्वाधिक होती.
सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष
अनगोळ येथे दरवषी दौडदरम्यान सजीव देखावे सादर केले जातात. यावषीही अशाच पद्धतीने सादर करण्यात आलेले देखावे शिवभक्तांचे लक्ष वेधून घेत होते. बाबले गल्ली अनगोळ येथे छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई यांच्या विवाहाचा देखावा सादर करण्यात आला. देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. लोहार गल्ली, अनगोळ येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने बालचमूंना घेऊन शेतकऱयांचा देखावा सादर केला. या दोन्ही देखाव्यांमुळे चैतन्यमय वातावरण निर्माण झाले.
विद्यानगर अनगोळ येथील युथ असोसिएशनतर्फे अनोखी सजावट केली होती. हँगिंगच्या माध्यमातून शिवरायांची मूर्ती बसविण्यात आली होती. हे चित्र मोबाईलमध्ये टिपण्याचा मोह कोणालाच आवरता आला नाही. ही आकर्षक सजावट अनेकांच्या व्हॉट्सऍप डीपीला होती. रांगोळय़ा व फुलांच्या सजावटींनी मन प्रफुल्लित होत होते.