मुंबई/प्रतिनिधी
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. सोमवारी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून ॲप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात राज कु्ंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. सात ते आठ तास चौकशी केल्यानंतर राज कुंद्रा यांना अटक केली. राज कुंद्राला अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी एकाला बेड्या ठोकल्या आहेत. नवी मुंबईतील नेरूळमधून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आलेली आहे. यातील काही जामीनावर सुटले आहेत.
पॉर्न फिल्म्स निर्मिती रॅकेट प्रकरणात पोलिसांनी सोमवारी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अटक केली. सुमारे सात ते आठ तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. पॉर्न फिल्म्स निर्मितीत राज कुंद्रा मुख्य सुत्रधार असल्याचं पोलिसांनी आतापर्यंत हाती आलेल्या पुराव्यांच्या आधारे म्हटलं होतं. राज कुंद्राला अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. रायन जॉन थार्प असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.