पुणे / प्रतिनिधी :
गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… असा जयघोष थेट अरुणाचल प्रदेशमधील भारत-चीन सीमेवर असलेल्या भारतीय लष्कराच्या ठाण्यावर झाला. भारतीय लष्करातील 1 मराठा बटालियनच्या सैनिकांनी सीमेवर गणेशोत्सवानिमित्त दगडूशेठ गणपतीच्या श्रींच्या प्रतिकात्मक मूर्तीची प्रतिष्ठापना करीत आगमन मिरवणूक काढली. दहीहंडीच्या दिवशी 19 ऑगस्ट 2022 रोजी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे ही श्रींची हुबेहुब 2 फूटी प्रतिकात्मक मूर्ती सैनिकांना देण्यात आली होती.
भारतीय लष्करातील 1 मराठा बटालियनचे कर्नल जयकुमार मुदलियार यांनी दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणाऱ्या मूर्तीची प्रतिष्ठापना सीमेवरील लष्कराच्या पोस्टमध्ये करण्याची इच्छा मागील वर्षी व्यक्त केली होती. ती मूर्ती श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीप्रमाणेच असावी, अशी त्यांची मनोमन भावना होती. त्याप्रमाणे ट्रस्टकडे विनंती करणारे पत्र पाठविले होते. त्यानुसार ट्रस्टने सैनिकांच्या इच्छेला मान देऊन श्रींची हुबेहुब 2 फुटी प्रतिकात्मक मूर्ती देण्याचे मान्य करीत बटालियनला मागील वषी व यावषी देखील दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये मूर्ती सुपूर्द केली. लष्करातील 1 मराठा बटालियनचे बालाजी कदम यांनी याकरिता समन्वयाचे काम केले.
अधिक वाचा : चांदणी चौकातील पूल येत्या 2-3 दिवसात पाडणार
गणेश चतुर्थीच्या दिवशी मंगलमूर्ती मोरयाचा गजर करीत सैनिकांनी सीमेवरील लष्कराच्या ठाण्यात हुबेहुब दगडूशेठ गणपतीच्या श्रींची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन केली. मराठा बटालियन दरवषी गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरी करते. त्यामुळे यंदा देखील पारंपरिक पद्धतीने थेट चीन सीमेवरील लष्करी ठाण्यात ही आगमन मिरवणूक काढण्यात आली. केळीचे खुंट वापरुन साकारलेल्या रथात दगडूशेठच्या श्रींची हुबेहुब मूर्ती विराजमान झाली होती.
भारतीय लष्कराच्या गणवेशात सर्व सैनिक मोठया उत्साहाने मिरवणुकीत सहभागी झाले होते. तसेच झांज वाजवित पारंपरिक खेळ देखील सैनिकांनी सादर केले. सामान्य नागरिकांप्रमाणेच देशाच्या सिमेवर लढणारे सैनिक देखील गणेशाची भक्ती करतात. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर सर्वदूर पसरलेली आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक पुण्यात येतात. मात्र, भारतीय सैनिक सीमेवर अहोरात्र पहारा देत असल्याने त्यांना पुण्यामध्ये येता येईल, असे नाही. अरुणाचल प्रदेशमधील सीमेवर देशामधील सर्व राज्यांतील सैनिक कार्यरत असतात. त्यामुळे दगडूशेठ गणपती बाप्पाचा आशीर्वाद तेथे देखील उत्सवाच्या यामाध्यमातून सर्व सैनिकांना मिळेल, अशी धारणा येथील सैनिकांनी व्यक्त केली.