तालिबानमध्येही फूट ः बरादर होऊ शकतो नवा प्रमुख
वृत्तसंस्था/ काबूल
तालिबानचा सर्वोच्च कमांडर हिबतुल्ला अखुंदजाला लवकरच त्याच्या पदावरून हटविले जाऊ शकते. अखुंदजादावरून तालिबानच्या पदाधिकाऱयांमध्ये खलबतं सुरू झाली आहेत, महिलांच्या शिक्षणावरून तालिबान सध्या जगभरातून होणाऱया टीकेला सध्या तोंड देत आहे. अफगाण महिलांना शिक्षणाची अनुमती दिली जावी अशी तालिबानच्या एका गटाची मागणी आहे. परंतु सर्वोच्च कमांडर अखुंदजादा इस्लामिक नियम आणि शरीया कायद्याचा दाखला देत वारंवार महिलांवरील बंदीचे समर्थन करत आहे. अशा स्थितीत तालिबानमध्ये फूट पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तालिबानमध्ये फूट पडल्यास याचा थेट परिणाम अफगाणिस्तानातील काळजीवाहू सरकारवर होणार आहे.
उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल गनी बरादर हा तालिबानच्या अमीर-उल-मोमिनीन पदाचा प्रबळ दावेदार असल्याचे मानले जात आहे. हिबतुल्लाह अखुंदजादाला या पदावरून हटविण्याची प्रक्रिया सध्या प्रारंभिक टप्प्यात आहे. तालिबानने मागील वर्षी डिसेंबरमध्ये विद्यापीठांमध्ये महिलांच्या शिक्षणावर बंदी घातली होती, तेव्हापासून तालिबानमध्ये अंतर्गत स्वरुपात संघर्ष सुरू झाला आहे. दुसरीकडे अनेक वरिष्ठ तालिबानी नेत्यांच्या कुटुंबातील मुली पाकिस्तान समवेत अनेक आखाती देशांमध्ये शिकत आहेत.
या नेत्यांची नावे चर्चेत
तालिबानच्या अधिकाऱयांनी अखुंदजादाचा उत्तराधिकारी म्हणून मुल्ला अब्दुल गनी बरादर, मुल्ला मोहम्मद याकूब आणि सिराजुद्दीन हक्कानी यांच्या नावांवर विचार केला आहे. तालिबान सर्वप्रथम हक्कानीला अमीर-उल-मोमिनीन करू पाहत होता, परंतु हक्कानी काबूल सोडण्यास तयार नाही. हक्कानीकडे सध्या अफगाणिस्तान सरकारमधील शक्तिशाली अंतर्गत मंत्रालय आहे. अशा स्थितीत सत्तेचा लाभ सोडून कंधारमध्ये काही निवडक लोकांदरम्यान कैद होण्याची त्याची तयारी नाही. याकूबचे वय केवळ 33 वर्षे असल्याने त्याचे नाव मागे पडले आहे. अशा स्थितीत आता सर्वांच्या नजरा मुल्ला अब्दुल गनी बरादरवर केंद्रीत झाल्या आहेत.
महिलांच्या स्वातंत्र्याच्या बाजूने
अफगाणिस्तानात तालिबान राजवटीतील अंतर्गत मंत्री सिराजुद्दीन हक्कानी आणि संरक्षणमंत्री मोहम्मद याकूब हे महिलांच्या शिक्षणावर बंदी घालण्याच्या विरोधात आहेत. हा नियम बदलला जावा अशी त्यांची इच्छा आहे. जनतेचा विरोध वाढल्यास तालिबान राजवट उलथवून टाकली जाण्याचा धोका त्यांना सतावत आहे. या दोघांनी यावरून सर्वोच्च नेता अखुंदजादासोबत चर्चा केली, परंतु कुठलाच परिणाम निघू शकलेला नाही. आंतरराष्ट्रीय दबावापोटी बंदी मागे घेणार नसल्याची ताठर भूमिका अखुंदजादाने घेतली आहे.
तालिबानच्या भूमिकेत बदल?
अफगाणिस्तानला सध्या आंतरराष्ट्रीय समर्थनाची गरज आहे. अशा स्थितीत तालिबान राजवटीने महिलांच्या शिक्षणावर घातलेली बंदी हटवावी. यामुळे विदेशातून अफगाणिस्तनाला मदत मिळू शकेल असे या दोघांचे म्हणणे आहे. परंतु अखुंदजादाकडून यासंबंधी सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. अशास्थितीत तालिबानचे उच्चाधिकारी सर्वोच्च नेत्याला पदावरून दूर करण्याचा विचार करत आहेत.