चिनी सैन्याला अध्यक्षांचा आदेश : अण्वस्त्र शाखेच्या प्रमुखपदी ह्युबिन
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी स्वत:च्या सैन्याला शस्त्रास्त्रांचे आधुनिकीकरण करण्याचा आदेश दिला आहे. सिचुआन प्रांतातील वायुदलाच्या वेस्टर्न थिएटर कमांडच्या पाहणीनंतर क्षी यांनी हा आदेश दिला आहे. चीनची सुरक्षा स्थिती अस्थिरता आणि अनिश्चिततांना सामोरी जात असताना सैन्याला देण्यात आलेली जबाबदारी पूर्ण करावी लागणार असल्याचे जिनपिंग यांनी म्हटले आहे. जिनपिंग हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चीनचे महासचिव असण्यासाब्sात सेंट्रल मिलिट्री कमिशनचे अध्यक्ष देखील आहेत.
लवकरात लवकर सैन्यात नव्या शस्त्रास्त्रांच समावेश करा आणि लढाऊ दल तयार करा असे जिनपिंग यांनी सैन्याला सांगितले आहे. खऱ्याखुऱ्या युद्धासारखी स्थिती निर्माण करत प्रशिक्षण देण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. चीनची जनता आणि पक्षाने दिलेले काम पूर्ण करणे हे सैन्याचे कर्तव्य असल्याचे जिनपिंग यांनी म्हटले आहे.
चीनचे सैन्य वेगाने स्वत:ची युद्धक्षमता वाढवू पाहत आहे. चीनने अलिकडेच स्वत:चे अत्याधुनिक लढाऊ विमान जे-20, वाययू-20 एरियल टँकर आणि झेड-20 युटिलिटी हेलिकॉप्टर जनतेसमोर सादर करत स्वत:च्या सामर्थ्याची जाणीव करून दिली आहे.
चीनने मंगळवारी स्वत:चा सैन्य दिन साजरा केला आहे. यापूर्वी जिनपिंग यांनी स्वत:च्या देशाच्या अण्वस्त्रांची जबाबदारी वांग ह्युबिन यांना सोपविली आहे. ह्युबिन हे 2020 पर्यंत चीनच्या नौदलाचे उपप्रमुख राहिले आहेत. वांग यांना आता चिनी सैन्याच्या रॉकेट फोर्सची जबाबदारी देण्यात आली आहे.