हिंदू महासभेची केंद्र सरकारकडे मागणी, काँग्रेसची टीका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अखिल भारतीय हिंदू महासभेने भारताच्या नोटांवरील गांधीजींच्या चित्राला आक्षेप घेतला असून या जागी थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे चित्र छापावे, अशी मागणी या संघटनेने केली आहे. या मागणीवर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षंानी टीका केली असून ती राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. सुभाषचंद्र बास यांचे स्वातंत्र्य संग्रामातील योगदान गांधीजींच्या योगदानापेक्षा कुठेही कमी नव्हते, असे प्रतिपादन संघटनेने केले.
काही दिवसांपूर्वी याच संघटनेने पश्चिम बंगालमधील एका दुर्गा पेंडॉलमध्ये गांधीजींचे चित्र दुर्गामातेच्या पायाखाली स्थापित केले होते. दुर्गामाता गांधीजींचे निर्दालन करीत आहे असा भाव त्यातून होत होता. त्यामुळे बरीच वादग्रस्तता निर्माण झाली होती. आता नोटांवरील गांधीजींचे चित्र काढून टाकावे, या मागणीमुळे ही संघटना प्रकाशात आली. यावर अद्याप भारत सरकारची प्रतिक्रिया समजू शकलेली नाही. मात्र, नवीन वाद निर्माण झाला आहे.
अशी मागणी करण्यामागे कोणाचाही अवमान करण्याचा हेतू नसून केवळ सुभाषचंद्र बोस यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा सन्मान राखणे हाच उद्देश असल्याचे हिंदू महासभेने स्पष्ट केलेले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाचा आजही तरुण वर्गावर प्रभाव आहे. त्यांचे नाव मनामध्ये देशभावना निर्माण करण्याचे कार्य करते. त्यांच्या नावाच्या केवळ उच्चारामुळे देशभक्ती जागृत होत असल्याने ते देशाचे दैवत बनले आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी नोटेवर त्यांचे चित्र छापणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे, असे हिंदू महासभेने प्रतिपादन केले असून मागणीचे समर्थन केले आहे.
काँग्रेस-तृणमूलचा विरोध
सुभाषचंद्र बोस यांचे चित्र नोटेवर छापण्याची मागणी राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने केली आहे. ही मागणी आश्चर्यचकित करणारी आहे. भाजप आणि संघ परिवार देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असून त्या मनोवृत्तीतून ही मागणी समोर आल्याची टीका या दोन्ही पक्षांनी केली. मात्र, हिंदू महासभेने आपला हेतू स्वच्छ असल्याचे स्पष्ट केले.