शिवनेरी गड किल्ल्याची प्रतिकृती बनवून गायत्री सुतार प्रथम : सूजल मोरे द्वितीय
वार्ताहर /किणये
कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी वाचनालय व सामाजिक संस्था यांच्यावतीने गावात किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी. आर. गावडे हे होते.
प्रांरभी शिवप्रतिमेचे पूजन मोहन तरवाळ यांच्याहस्ते करण्यात आले. प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी केले. लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचे कार्य सलग चार वर्षे वाचनालयाच्या माध्यमातून केले जाते. शिवराय हे दैवत आहे. किल्ला प्रतिकृतीतून इतिहास जिवंत ठेवला जातो. किल्ले हे शौर्य, पराक्रमाचे प्रतिक आहे. बालचमूंनी आकर्षक विविध किल्ल्यांची प्रतिकृती तयार करून शिवरायांचा इतिहास जागवला आहे, असेही नाईक यावेळी म्हणाले.
मान्यवरांचे स्वागत पृथ्वी जाधव यांनी केले. किल्ला स्पर्धेसाठी ज्यांनी भरीव देणगी दिली ते मोहन तळवार व धावपटू प्रेम बुरुड यांचा शाल, श्रीफळ देऊन विशेष सत्कार मोहन मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
स्पर्धेचे पहिले पाच क्रमांक
प्रथम-गायत्री दी. सुतार (शिवनेरी), द्वितीय सूजल भ. मोरे (सिंहगड), तृतीय ओंकार भा. बाचीकर (प्रतापगड), चौथा क्रमांक प्रेम य. बुरूड (पारगड), पाचवा सूजल द. येळ्ळूरकर (सिंहगड). विजेत्यांना रोख रक्कम, मेडल देऊन गौरविले. पी. आर. गावडे यांनी किल्ला बनवलेल्या सर्व मुला-मुलींचे विशेष कौतुक भाषणातून केले. रवळू मा. मोरे, मोनाप्पा य. मोरे, यशवंतराव मोरे, युवराज प. नाईक, रघुनाथ बाचीकर, एम. पी. मोरे, अभिषेक सुतार, अभियंता सुहास गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. गावात 40 किल्ले साकारण्यात आले होते. सूत्रसंचालन मनोहर प. मोरे यांनी केले.