जत प्रतिनिधी
जत तालुक्यातील बिळूर येथील कामगोंड वस्तीवर गुरुबसु शिवगोंडा कामगोंड (वय 37) यांचे भर दिवसा घराचा दरवाजा तोडून रोख दोन लाख 43 हजार 500 रुपये व 43 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने,असा 2 लाख 84 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यानी पळवून नेला. रविवारी दि. 23 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत जत पोलिस ठाण्यात कामगोंडा यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहिती अशी की, रविवारी सकाळी 9 च्या सुमारास फिर्यादी कामगोंड व त्यांचे भाऊ उमेश असे बागेत कामासाठी गेले. वडील हे जनावराना पाणी पाजण्यासाठी व चारा टाकणेसाठी जुन्या घराजवळ गेले होते. बागेत काम सुरू असताना घरातील सर्वजण 11 वाजताच्या सुमारास घराला कुलूप लावुन बागेत गेले. त्यानंतर दुपारी 1 वाजता बागेतील काम झालेनंतर ते घरी गेले असता घराचा दरवाजा उघडा दिसला. यावेळी खोलीतील साहित्य विस्कटलेले दिसले. तसेच हॉलमधील लोखंडी कपाटाचे लॉक तोडलेले दिसले.कपाटात ठेवलेली रोख रक्कम 1,43,500 रुपये व सोन्याची कर्णफुले, बदाम, अंगठ्या असे दागिने चोरटयांनी लंपास केले होते . यानंतर कामगोंड यांनी लगेचच जत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याचा अधिक तपास जत पोलिस करत आहेत.