आवश्यक माहितीचा अहवाल सादर करण्याची सूचना : रहिवाशांना सुविधा उपलब्ध करण्यास अडचणी
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट कक्षेत येणाऱया बाजारपेठ परिसरासह महापालिका हद्दीलगत असलेल्या परिसराचा समावेश महापालिकेत करण्याचा विचार संरक्षण खात्याने केला आहे. याअंतर्गत आवश्यक माहितीचा अहवाल सादर करण्याची सूचना उत्तराखंडसह सहा कॅन्टोन्मेंटना केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
ब्रिटिशकाळात सैनिकी प्रशिक्षण केंदे सुरू करून त्याठिकाणी कॅन्टोन्मेंट बोर्डची स्थापना करण्यात आली होती. देशात 62 कॅन्टोन्मेंट बोर्ड असून या कॅन्टोन्मेंट परिसरात बाजारपेठेचा परिसर विस्तारला आहे. पण केंद्र आणि राज्य शासनाने कॅन्टोन्मेंटच्या विकासासाठी देण्यात येणाऱया निधीमध्ये कपात केल्याने कॅन्टोन्मेंट बोर्ड चालविणे कठीण बनले आहे. बाजारपेठेसह कॅन्टोन्मेंट परिसरातील रहिवाशांना नागरी सुविधा उपलब्ध करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. नागरी वसाहतीत लोकसंख्या वाढल्याने शासनाच्या सुविधा अपुऱया पडू लागल्या आहेत. त्यामुळे बाजारपेठेसह कॅन्टोन्मेंट परिसरातील रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हद्दीमध्ये मिलिटरी प्रशिक्षण केंद्र आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीलगत बाजारपेठ परिसराचा विस्तार वाढला आहे.
त्यामुळे महापालिका हद्दीजवळील व बाजारपेठेचा परिसर महापालिकेत समाविष्ट करण्याचा विचार केंद्रीय संरक्षण खात्याने चालविला आहे. यापूर्वी विविध कॅन्टोन्मेंट बोर्डकडून माहिती घेण्यात आली होती. कॅन्टोन्मेंट हद्दीतील बाजारपेठेची आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीची माहिती घेण्यात आली आहे. बहुतांश कॅन्टोन्मेंट परिसराला स्थानिक स्वराज्य संस्थांची हद्द जोडली आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंट परिसराच्या सभोवती शहराची व्याप्ती पसरली आहे.
त्यामुळे कॅन्टोन्मेंटचा बहुतांश भाग महापालिकेला जोडला जावू शकतो. पण संरक्षण खात्याने कॅन्टोन्मेंट बोर्डला याबाबत कोणतेच पत्र पाठविले नाही. मात्र देशातील विविध कॅन्टोन्मेंटना पत्र पाठवून बाजारपेठेचा परिसर महापालिकेत समाविष्ट करण्याच्यादृष्टीने अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे. सध्या उत्तराखंडसह 6 कॅन्टोन्मेंट बोर्डना पत्र पाठवून कॅन्टोन्मेंट बाजारपेठेचा समावेश महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेत करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. कॅन्टोन्मेंटकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केंद्रीय संरक्षण खात्याच्यावतीने केली जाणार आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये येणाऱया बाजारपेठेसह विविध भागाचा समावेश महापालिकेत होवू शकतो. पण शासनाकडून अद्याप कोणताच आदेश कॅन्टोन्मेंट बोर्डला आला नाही.