शहापूर विभागात रॅली तर उत्तर विभागात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
बेळगाव : भारत स्वच्छता अभियानांतर्गत शहरामध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. सोमवार दि. 25 रोजी दक्षिण विभागामध्ये जनजागृती फेरी काढण्यात आली. शहापूर येथील सरस्वती हायस्कूलच्या विद्यार्थिनींना या फेरीमध्ये सहभागी करण्यात आले होते. संपूर्ण शहापूर परिसरात फेरी काढून ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याबाबत या फेरीतून जनजागृती करण्यात आली. या जनजागृती फेरीचे उद्घाटन महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक गिरीश धेंगडी, साहाय्यक अभियंता हणमंत कलादगी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शहापूर परिसरात फेरी काढण्यात आली. यावेळी कचरा गोळा करण्याबाबत हातामध्ये फलक घेऊन आवाहन करण्यात आले. विविध चौकांमध्ये थांबून देखील कचरा गोळा करण्याबाबतची माहिती देण्यात आली.
कचरा गोळा करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
त्यानंतर उत्तर विभागातही मराठा मंडळ शाळेतील विद्यार्थ्यांना कचरा गोळा करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप देखील करण्यात आले. कचरा गोळा करण्याबाबत शाळांमध्ये जनजागृती केल्यानंतर निश्चितच त्याचा उपयोग होणार असल्याचे महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी यावेळी सांगितले. शहर स्वच्छ करण्यासाठी आमचे प्रयत्न यापुढेही सुरू राहणार आहेत, असे ते म्हणाले.