सत्यता पडताळणीसाठी डेरा भक्ताची न्यायालयात याचिका
चंदिगढ / वृत्तसंस्था
सध्या शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम हा बनावट असल्याचा दावा केला जात आहे. चंदिगढमधील डेरा भक्त अशोक कुमार आणि अन्य काहींनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात सत्यता पडताळणीसाठी याचिका दाखल केली असून त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. राम रहीम खरा आणि खोटा? यासंबंधी गेल्या बऱयाच दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरू होती.
हरियाणातील डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमला पॅरोल देण्यात आला आहे. रोहतकच्या सुनारिया तुरुंगात बंद असलेल्या गुरमीत राम रहीमला तुरुंग विभागाने पॅरोल दिला आहे. 17 जून रोजी सकाळी राम रहीमला तुरुंगातून बाहेर आणण्यात आले असून पॅरोल कालावधीत तो उत्तर प्रदेशमधील बागपत आश्रमात राहत आहे. हा आश्रम बागपतच्या बरनावा गावात आहे.
सध्याच्या राम रहीमचे हावभाव पूर्वीसारखे राहिलेले नाहीत, असे मत याचिकेत मांडण्यात आले असून याचिकादारांनी हरियाणा सरकार, हनीप्रीत आणि सिरसा डेरा प्रशासक पी. आर. नैन यांना पक्षकार बनवले आहे. खऱया डेरा प्रमुखाचे अपहरण केल्यानंतर बनावट तुरुंगात टाकल्याचे त्यांना सूत्रांकडून समजले. आता ही बनावटगिरी खरी ठरवून डेराचे सिंहासन बळकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुरुंगात असलेल्या बनावट राम रहीमची चौकशी झाली पाहिजे, असेही याचिकेत म्हटले आहे. त्यांनी नुकताच कथित डेरा प्रमुखाचा व्हिडीओ जारी केला असून त्याची तपासणी सुरू आहे.