रशियाच्या सैन्यात सामील होणार नाही : प्रिगोजिन
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने एक आदेश जारी केला असून याच्या अंतर्गत युक्रेन विरोधात लढत असलेल्या सर्व रशियन स्वयंसेवकांच्या तुकड्यांना रशियाच्या सैन्यात सामील व्हावे लागणार आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी सर्व खासगी सैन्याकडून एका करारावर स्वाक्षरी करविण्यात येणार आहे. परंतु रशियातील सर्वात मोठे खासगी सैन्य असलेल्या वॅगनरने हा करार करण्यास नकार दिला आहे. संरक्षण मंत्रालयासोबत आम्ही कुठलाच करार करणार नसल्याचे वॅगनरचे मालक येवगेनी प्रिगोजिन यांनी म्हटले आहे.
रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगू यांना सैन्य नीटप्रकारे हाताळता येत नसल्याची टिप्पणी देखील प्रिगोजिन यांनी केली आहे. येवगेनी यांच्या या वक्तव्यावर रशियाच्या सरकारकडून अद्याप कुठलीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. रशियातील वॅगनरच्या सदस्यांवर मानवाधिकारांच्या उल्लंघनाचे आरोप झाले आहेत. अशा स्थितीत वॅगनर ग्रूपला रशियाच्या सैन्यात सामील केले जाणार की नाही हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.
वॅगनर ग्रूपनेच मागील महिन्यात रशियासाठी बाखमुत भागावर कब्जा केला होता. येथील लढाईत येवगेनी प्रिगोजिन यांच्या खासगी सैन्याचे एक लाखाहून अधिक सैनिक मारले गेल्याचा दावा अमेरिकेने केला होता. तर प्रिगोजिन यांनी रशियाच्या सरकारवर योग्यप्रकारे शस्त्रास्त्रs अन् दारूगोळा न पुरविण्याचा आरोप केला होता.
रशियाचा नाईलाज
खासगी सैन्याच्या सदस्यांना देशाच्या सैन्यात सामील करण्यावाचून रशियासमोर आता पर्याय राहिलेला नाही. रशियाच्या कब्जात असलेले भूभागांवर युक्रेनकडून हल्ले केले जात असल्याने रशियासमोर मोठी समस्या उभी राहिली आहे. युक्रेनची वाटचाल रोखण्यासाठी रशियाला अधिकाधिक सैनिकांची गरज भासत आहे. युक्रेनने डोनेट्स्क भागात रशियाच्या कब्जातील 3 गावांची मुक्तता करविली आहे.
प्रिगोजिन हे पुतीन यांचे निकटवर्तीय
वॅगनर ग्रूपचे संस्थापक येवगेनी प्रिगोजिन यांना रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचे आचारी देखील म्हटले जाते. प्रिगोजिन हे पूर्वी एक रेस्टॉरंट चालवायचे, जेथे पुतीन हे वारंवार जात होते. यामुळे प्रिगोजिन हे पुतीन यांचे निकटवर्तीय झाले होते. रशियाच्या सरकारकडून त्यांना कोट्यावधींची कंत्राटं मिळू लागली होती. येवगेनी हेच वॅगनर ग्रूपला निधी पुरवितात.