कार्यगटाची स्थापना, चीनवर नाव न घेता टीका
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जी-20 विदेश मंत्र्यांच्या परिषदेसाठी येथे एकत्र जमलेल्या देशांपैकी ‘क्वाड’ संघटनेच्या चार देशांची स्वतंत्र बैठक शुक्रवारी पार पडली आहे. या बैठकीत संघटनेचे सदस्य असणाऱया भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांच्या मंत्र्यांची ही बैठक होती. या बैठकीत पाकिस्तान आणि चीन यांना गंभीर इशारा देण्यात आला आहे. दहशतवाद आणि विस्तारवाद यासंबंधी तो आहे.
दहशतवाद रोखण्यासाठी क्वाडने कार्यगट स्थापन केला असून हा पाकिस्तानला मोठाच संदेश आहे. या गटाची प्रथम बैठक अमेरिकेत याच वर्षी होणार आहे. या बैठकीत गटाची कार्यपद्धती निर्धारित केली जाणार आहे. गटाने सर्व प्रकारच्या दहशतवादाची कठोर निंदा केली असून आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांवर निर्बंध लादण्याच्या सुरक्षा परिषदेच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र सुरक्षा परिषदेत काही देश यासंबंधात नकाराधिकाराचा उपयोग करुन कुख्यात दहशतवाद्यांना संरक्षण देतात. अशा देशांना पारदर्शकता दाखविण्याचे आवाहन करण्यात आले.
चीनला अप्रत्यक्ष इशारा
चीनने आजवर कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानची पाठराखण करण्याचे धोरण अवलंबले आहे. प्रशांत हिंदी महासागर क्षेत्रातही चीन आक्रमक विस्तारवादाची भूमिका घेत आहे. त्याविरोधात क्वाडचे धोरण असून हे क्षेत्र मुक्त, स्पष्ट आणि समृद्ध राखण्याचे या संघटनेचे धोरण आहे. शुक्रवारी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांची भेट या संघटनेच्या आणखी तीन विदेश मंत्र्यांनी घेतली. चारही मंत्र्यांनी हिंद-प्रशांतीय क्षेत्रातील परिस्थितीची व्यापक समीक्षा केली. या बैठकीचे अध्यक्षस्थान जयशंकर यांच्याकडे होते. बैठकीत अमेरिकेचे विदेश मंत्री अँटोनी ब्लिंकन, ऑस्ट्रेलियाचे विदेश मंत्री पेनी व<ाँग तसेच जपानचे विदेश मंत्री योशिमाशा हयाशी यांनी या बैठकीत भाग घेऊन विचार व्यक्त केले.
संयुक्त निवेदन
बैठकीनंतर या चारही विदेश मंत्र्यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले. नियम आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था, संयुक्त राष्ट्र संहितेच्या आधारावर आंतरराष्ट्रीय कायदा तसेच सर्व देशांचे सार्वभौमत्व, राजकीय स्वातंत्र्य आणि क्षेत्रीय अखंडता या मुद्दय़ांवर क्वाडचे एकमत असून आम्ही या भूमिकचे ठाम समर्थन करतो, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. ही बैठक महत्वाची मानण्यात आली आहे.