आप-भाजप नगरसेवक भिडले ः आसनावरून पडल्याने काहीजण जखमी
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीत महापौर, उपमहापौर आणि एमसीडीच्या स्थायी समिती सदस्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना शुक्रवारी सभागृहात जोरदार राडा झाला. तब्बल चार तासांच्या गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. गदारोळामुळे महापौरपदाची निवडणूक लांबणीवर पडली असून ‘आप’ने या मुद्दय़ावर न्यायालयात जाण्याचे संकेत दिले आहेत.
शुक्रवारी सकाळी 11 वाजता नगरसेवकांचा शपथविधी सुरू होणार होता. परंतु प्रोटेम स्पीकरने प्रथम नामनिर्देशित सदस्यांना शपथ देण्यास सुरुवात करताच आम आदमी पक्षाच्या (आप) सदस्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली. आप नगरसेवकांच्या कृतीनंतर भाजपच्या नगरसेवकांनीही त्यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. यादरम्यान सभागृहात दोन्ही बाजूंमध्ये धक्काबुक्की आणि हाणामारी झाली. आपचे नगरसेवक प्रोटेम स्पीकरच्या आसनावर चढले. यावेळी काही नगरसेवक खुर्ची उचलून शिवीगाळ करतानाही निदर्शनास आले. ढकला-ढकलीमध्ये काहीजण खाली पडल्यामुळे जखमीही झाल्याचे समजते.
महापौरपदाच्या निवडणुकीसाठी उपराज्यपालांनी भाजप नगरसेवक सत्या शर्मा यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली. यापूर्वी ‘आप’ने मुकेश गोयल यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. ‘आप’ने सत्या शर्मा यांच्या नावावर आक्षेप नोंदवला. तरीही प्रोटेम स्पीकर सत्या यांनी नामनिर्देशित सदस्यांना शपथ देण्यास सुरुवात करताच ‘आप’च्या नगरसेवकांनी निषेध आणि घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
नामनिर्देशित सदस्यांना सुरुवातीला शपथ दिली जात नाही, पण भाजप ही परंपरा बदलत आहे, असे म्हणणे आम आदमी पक्षाने मांडले. आपच्या या मतावर भाजपच्या नेत्यांनी टीका केली आहे. आप नेत्यांना नियमांची माहिती नाही. त्यामुळे ते गोंधळ घालत आहेत. बहुमत असताना भीती कशाला? ‘आप’चे खासदार राज्यसभेतही गोंधळच घालतात, असा हल्लाबोल भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी केला आहे.
दुसरीकडे, काँग्रेसने महापौरपदाच्या निवडणुकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. आप आमदार आतिशी यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेस भाजपची बाजू घेत असल्याचा आरोप केला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत बहुमतासाठी 133 चा आकडा आवश्यक आहे. ‘आप’कडे 150 तर भाजपकडे 113 मते आहेत. त्याशिवाय दिल्ली महानगरपालिका 1957 कायद्यांतर्गत 10 जणांना नामनिर्देशित करण्यात आले आहे. मात्र, या सदस्यांना महापौर किंवा उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही.