रेल्वे सुरक्षा दलाची कामगिरी : दोघांना अटक रेल्वेची तिकीटे-ओळखपत्रे जप्त
प्रतिनिधी /मडगाव
मडगावच्या ईएसआय हॉस्पीटल जवळ असलेल्या फातीमा टूर्स अँड ट्रव्हल्स दुकानातून रेल्वेच्या तिकीटाचा काळाबाजर केला जात असल्याची तक्रार रेल्वे सुरक्षा दलाकडे पोचल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई करताना दोघांना अटक केली असून 62 बनावट ओळखपत्रे आणि रेल्वेची तिकीटे तसेच कागदपत्रे जप्त केली आहेत.
रेल्वे सुरक्षा पोलिस दलाचे पोलिस निरिक्षक विनोद मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 डिसेंबर रोजी आम्हाला सूत्रांकडून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी मडगावातील ईएसआय हॉस्पीटल जवळील फातीमा टूर्स अँड ट्रव्हल्स दुकानावर छापा टाकला. या छाप्यात 2 संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी 62 बनावट ओळखपत्र व कागदपत्रे जप्त केली आहेत. त्यांचा वापर कथितरित्या रेल्वे तिकीट बुकींगसाठी वापर केला जात होता. या छाप्यामध्ये लाखेंची तिकीटे जप्त करण्यात आली आहेत.
छाप्यात लाखो रुपयांच्या रेल्वे तिकिटे जप्त करण्यात आली. काही तिकिटांचा प्रवास झाला असून काही तिकीटांवरुन प्रवास व्हायचा आहे. बनावट आयडी तयार करुन ही तिकीटे मिळवण्यात येत होती व ज्यादा रक्कम घेऊन प्रवाशांना विकली जात होती असे मिश्रा यांनी सांगितले.
ज्या तिकीटांचा प्रवास झालेला नाही ती तिकीटे लगेच ब्लॉक करण्यात येतील. आणखी तिकीटे जप्त करण्याची बाकी असून त्याची माहिती मिळविण्यात येत आहेत. या प्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहेत. त्याची कसून चौकशी सुरु आहे असेही मिश्रा यांनी सांगितले.