आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरशी मुकाबला
वृत्तसंस्था/ बेंगळूर
राजस्थान रॉयल्सची लढत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध होणार असून त्यावेळी पुन्हा विजयपथावर परतण्याच्या दृष्टीने त्यांना मधल्या फळीकडून अधिक चांगल्या कामगिरी अपेक्षा असेल. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूची वाटचाल सातत्यहीन राहिलेली असली, तरी तो निश्चितच धोकादायक संघ आहे. सध्या राजस्थान रॉयल्स चार विजय आणि दोन पराभवांनिशी आठ गुणांसह गुणतालिकेवर आघाडीवर आहे, तर ‘आरसीबी’ तीन विजय आणि तितक्याच पराभवांसह पाचव्या स्थानावर आहे.
लखनौ सुपर जायंट्सविऊद्धच्या मागील सामन्यात 155 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने सलामीवीर यशस्वी जयस्वाल (44) आणि जोस बटलर (40) यांच्या जोरावर 11.3 षटकांत 87 धावा काढून जोरदार सुरुवात केली होती. पण मधली फळी कोसळल्याने त्यांना 10 धावांनी पराभव पत्करावा लागला. राजस्थानकडे जयस्वाल आणि बटलर यांच्या रूपाने सर्वांत प्रभावी सलामीची जोडी आहे आणि ही जोडी या हंगामात सतत चांगली कामगिरी करत आली आहे. पण मधल्या फळीची कामगिरी ही त्यांच्यासाठी चिंतेची बाब बनली आहे.
कर्णधार संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर यांनी धावा जमविलेल्या आहेत, परंतु ते पुरेसे सातत्यपूर्ण राहिलेले नाहीत आणि सामना जिंकण्याच्या दृष्टीने संघ त्यांच्यावर अवलंबून आहे. देवदत्त पडिक्कल आणि रियान पराग अपेक्षांना जागण्यात अपयशी ठरले आहेत. अनुभवी ट्रेंट बोल्ट आणि संदीप शर्मा यांच्या रूपाने राजस्थान रॉयल्सकड चांगले सलामीचे गोलंदाज आहेत. पण फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली यांच्याविऊद्ध त्यांची कसोटी लागेल. फिरकी विभागात रविचंद्रन अश्विनने प्रभावित केलेले आहे, परंतु यजुवेंद्र चहल थोडा महाग ठरलेला असून त्याने आपला खेळ उंचावण्याची गरज आहे.
राजस्थान रॉयल्सप्रमाणे ‘आरसीबी’कडे डू प्लेसिस आणि कोहली यांच्या रूपाने सर्वांत प्रभावी सलामीच्या जोडींपैकी एक आहे. या मोसमात दोघेही फॉर्मात आहेत. त्यांनी आतापर्यंत दोन शतकी भागीदाऱ्या केलेल्या असून दोघांनी प्रत्येकी चार अर्धशतके नोंदवलेली आहेत. ग्लेन मॅक्सवेलनेही आपल्या फटकेबाजीचा पराक्रम दाखवला आहे, पण त्यात सातत्य दिसून आलेले नाही. ‘आरसीबी’ला मधल्या फळीतील अनुभवी दिनेश कार्तिक, महिपाल लोमलोर, शाहबाज अहमद आणि सुयश प्रभुदेसाई यांच्याकडूनही अपेक्षा असतील.
‘आरसीबी’चा मारा मोहम्मद सिराजमुळे अधिक तिखट बनला आहे. सिराज फॉर्ममध्ये असून त्याने सहा सामन्यांतून 12 बळी घेतले आहेत. मागील सामन्यात त्याने 21 धावांत 4 बळी घेतले. सिराजला वेन पारनेल आणि हर्षल पटेल यांची चांगली साथ लाभत आहे. पण हे दोन्ही गोलंदाज थोडे महागडे ठरले आहेत. ‘आरसीबी’च्या फिरकी विभागाचे नेतृत्व श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगा डिसिल्वाकडे असून तो आतापर्यंतच्या तीन सामन्यांमध्ये प्रभावी दिसलेला आहे.
संघ-राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन (कर्णधार), अब्दुल बासिथ, मुऊगन अश्विन, रविचंद्रन अश्विन, के. एम. आसिफ, ट्रेंट बोल्ट, जोस बटलर, केसी करिअप्पा, यजुवेंद्र चहल, डोनोवन फरेरा, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, ओबेद मॅकॉय, देवदत्त पडिक्कल, रियान पराग, कुणालसिंह राठोड, ज्यो रूट, नवदीप सैनी, संदीप शर्मा, कुलदीप सेन, आकाश वसिष्ठ, कुलदीप यादव, अॅडम झाम्पा.
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), आकाश दीप, फिन अॅलन, अनुज रावत, अविनाश सिंग, मनोज भंडागे, मायकेल ब्रेसवेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, सिद्धार्थ कौल, विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, वेन पारनेल, हर्षल पटेल, सुयश प्रभुदेसाई, राजन कुमार, शाहबाज अहमद, कर्ण शर्मा, हिमांशू शर्मा, सोनू यादव, विजयकुमार वैशाख, डेव्हिड विली.