अयोध्येतील राम मंदिर न्यासाची घोषणा, पंतप्रधान मोदींना पूजेसाठी आमंत्रण
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी वर्षात 22 जानेवारी या दिवशी अयोध्येतील भव्य राममंदिरात भगवान रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण पाठविण्यात आले असून त्यांच्याच हस्ते ही प्राणप्रतिष्ठा केली जाईल, असे राम मंदिर न्यासाने सोमवारी घोषित केले आहे.
या दिवशी रामलल्लाची स्थापना मंदिराच्या गर्भगृहात केली जाणार आहे. तो पर्यंत मंदिराचे सर्व निर्मितीकार्य पूर्ण केले जाईल. त्या दृष्टीने सध्या निर्मितीकार्याची रुपरेषा निर्धारित करण्यात आली असून कार्याची मांडणी करण्यात येत आहे. 22 जानेवारीला भारतासह जगभरातील कोट्यावधी रामभक्तांची प्रतीक्षा संपणार आहे.
सर्व मंदिरांमध्ये सजावट
रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होण्याच्या दिवशी देशभरातील सर्व महत्वाची मंदिरे आणि तीर्थस्थळे सजविण्यात येणार असून या मंदिरांमध्ये आणि स्थळांमध्ये धार्मिक कार्यक्रम केले जाणार आहेत. राम मंदिर न्यासाने तसे आवाहन विविध तीर्थक्षेत्रांच्या व्यवस्थापनांना आणि मंदिरांना केले आहे. प्राणप्रतिष्ठेचा महोत्सव संपूर्ण देशभर साजरा करण्याची योजना असून त्यासाठी सज्जता होत आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा संपूर्ण देशभर आणि जगातही सर्वत्र नागरिकांना पाहता यावा, यासाठीही योजना करण्यात आल्याची माहिती न्यासाने दिली.
निर्माणकार्याची प्रगती
अयोध्येतील भव्य राम मंदिराचे निर्माण कार्य वेगाने होत आहे. सध्या गर्भगृहाच्या वरचे निर्माणकार्य करण्यात येत आहे. ऑक्टोबर 2023 पर्यंत तळमजल्याचे काम पूर्ण होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व निर्माण कार्य पूर्ण केले जाईल. ते निर्धारित कालावधीत पूर्ण व्हावे, अशाप्रकारे संपूर्ण योजना साकारली जात आहे. प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठेच्या दिनी अयोध्येत प्रचंड संख्येने रामभक्तांची उपस्थिती अपेक्षित असून या संख्येचे व्यवस्थापन करण्याची योजनाही सज्ज आहे. भाविकांच्या अयोध्येपर्यंतच्या प्रवासासाठी विशेष व्यवस्था केली जाण्याची शक्यता आहे. राम मंदिराचा परिसर भव्य असल्याने कितीही संख्येने भाविकांचे आगमन झाले, तरी कोणतीही असुविधा अनुभवास येणार नाही, अशाप्रकारे सर्व व्यवस्था करण्यासाठी राम मंदिर न्यासासह प्रशासनही सज्ज राहणार आहे.
सात दिवस चालणार महोत्सव
रामलल्ला प्राणप्रतिष्ठा महोत्सव सलग सात दिवस साजरा करण्यात येणार आहे. या काळात राम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. नित्य पूजापाठ, अभिषेक, प्रसाद वितरण यांच्यासह धर्माशी निगडीत असणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन होईल. प्राणप्रतिष्ठा झालेल्या दिवसापासूनच हे भव्य राम मंदिर भाविकांना दर्शनासाठी मुक्त करण्यात येईल. या मंदिरामुळे अयोध्या, नजीकचा परिसर आणि उत्तर प्रदेशातही धार्मिक पर्यटनाला मोठे प्रोत्साहन मिळेल. प्रतिदिन लक्षावधी भाविक भगवान रामलल्लाच्या दर्शनाला येतील, अशी अपेक्षा असून त्यादृष्टीने सज्जता ठेवली जाणार आहे.