ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यातील ‘रॅपिडो’ बाईक टॅक्सी आणि रिक्षाचालकांच्या वादावर आज हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी रॅपिडोची सेवा विनापरवाना असल्याचा ठपका ठेवत हायकोर्टाने आज दुपारी 1 वाजल्यापासून सरसकट सर्व सेवा बंद करण्याचे आदेश रॅपिडोला दिले.
रॅपिडोची सेवा सुरू झाल्यानंतर अनेकांनी रिक्षाकडे पाठ फिरवत रॅपिडोला पसंती दिली होती. त्यामुळे रिक्षाचालकांनी रॅपिडोची सेवा बंद करण्यासाठी अनेकदा संप पुकारला. मात्र, त्यामधून तोडगा न निघाल्याने रिक्षाचालकांनी कोर्टात धाव घेतली. आज यावर हायकोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी राज्य परिवहन विभागाने रॅपिडोची अनधिकृतरित्या बाईक टॅक्सी सेवा सुरू असल्याचे कोर्टाला सांगितले. बाईक टॅक्सीसोबत कंपनीची डिलिव्हरी सेवाही विनापरवाना असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे हायकोर्टाने कंपनीला फटकारत आपली सेवा पुढील सुनावणीपर्यंत तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले.