लाभार्थी प्रतिक्षेत, सर्व्हरडाऊनचा फटका
प्रतिनिधी/ बेळगाव
शिधापत्रिका वितरणाला पुन्हा स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे शिधापत्रिकेसाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची घोर निराशा झाली आहे. मागील काही दिवसांपासून ठप्प असलेल्या शिधापत्रिका वितरण प्रक्रियेला सुरुवात झाली होती. मात्र चारच दिवसांत हे काम थांबल्याने लाभार्थ्यांना रेशनकार्डपासून वंचित रहावे लागले आहे.
काँग्रेस सरकारने पाच गॅरंटी योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकी अन्नभाग्य योजनेंतर्गत रोख निधी दिला जात आहे. त्यामुळे रेशनकार्डच्या मागणीत वाढ झाली आहे. विशेषत: अंत्योदय आणि बीपीएल कार्डसाठी अर्ज केलेल्यांची संख्या अधिक आहे. मात्र नवीन रेशनकार्ड वितरणाचे काम काही दिवसांत ठप्प झाले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना पुन्हा रेशनकार्डच्या प्रतीक्षेत रहावे लागले आहे.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्ड अनिवार्य आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून रेशनकार्ड वितरणाच्या कामात सातत्याने व्यत्यय निर्माण होऊ लागला आहे. सर्व्हरडाऊन आणि इतर तांत्रिक समस्यांमुळे रेशनकार्ड वितरणात अडचणी येवू लागल्या आहेत. नोव्हेंबर प्रारंभीच रेशनकार्ड वितरणाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र केवळ चार दिवसांतच या कामाला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांना नवीन रेशनकार्डपासून वंचित रहावे लागले आहे.
अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना कार्डे वितरित केली जाणार
श्रीशैल कंकणवाडी-सहसंचालक अन्न व नागरी पुरवठा खाते
शिधापत्रिका वितरण काहीकाळाकरिता स्थगित करण्यात आले आहे. लवकरच शिधापत्रिका वितरणाला सुरुवात केली जाईल. आतापर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना कार्डे वितरित केली जाणार आहेत. काही सधन लाभार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यांचे अर्ज रद्द केले जाणार आहेत.