जिल्ह्याला 10 सप्टेंबरपर्यंत पावसाचा ‘यलो अलर्ट’; परतीचा वादळी पाऊस बरसण्याचा अंदाज
रत्नागिरी प्रतिनिधी
सध्या रत्नागिरी शहरात पावसाचा व उन्हाचा खेळ सुरु आहे. अचानक मध्येच पडणारी पावसाची सर आणि अचानक होणारे उन्हाचे दर्शन यामुळे भाद्रपदात रत्नागिरीकर श्रावणसरींचा अनुभव घेत होते. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याला कुलाबा वेधशाळेकडून 6 ते 10 सप्टेंबरदरम्यान पावसाचा पिवळा इशारा देण्यातआला आहे. यामुळे पावसाच्या पूर्वा नक्षत्राचा वाहन असलेल्या ‘मेंढ्या’ची जिल्ह्यात चौफेर बरसात ती सुध्दा वादळी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
वेधशाळेकडून प्राप्त माहितीनुसार, 7 सप्टेंबर रोजी विजांच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगड़ाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 8 ते 10 सप्टेंबरदरम्यान जिह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात मिश्र स्वरुपाचे वातावरण पहायला मिळत आहे. यंदा पावसाचे प्रमाण महिनागणिक बदलत गेले. कधी कमी-कधी जास्त स्वरुपात पाऊस बरसल्याने आणि नंतर पाऊस गायब झाल्याने यंदा परतीच्या पावसाला लगेच सुरुवात होणार की काय, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र काही दिवसांपूर्वी हवामान विभागाच्याअंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात उकाड्यासोबत पावसाचे प्रमाणही अधिक असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र ऑगस्टची अखेर होता-होता पावसाने पुरती पाठ फिरवली तसेच सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र इतरवेळी कडकडीत उन होते. त्यामुळे ऐन सप्टेंबरमध्ये ऑक्टोबर हिटचा अनुभव येत होता. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र त्या तुलनेत रत्नागिरी शहरात पावसाने ओढ दिल्याचे चित्र आहे. ठिकठिकाणी तयार होण्याच्या स्थितीत असणारे भातपीक पावसाच्या गैरहजेरीने करपायला लागले आहे. जिल्हावासियांना पावसाची आतूरतेने प्रतीक्षा होती. दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पावसाने हजेरी लावल्यास मान टाकलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. आता तर परतीच्या पावसाचे पूर्वा नक्षत्र सुरू आहे. हे नक्षत्र 12 सप्टेंबरला संपणार आहे. पण याच नक्षत्रात जिल्ह्याला पावसाचा पिवळा इशारा (यलो अलर्ट) असल्यानेप्रशासनाच्यावतीने जिल्हावासियांना सावधानता व खबरदारी बाळ्गण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची जोरदार शक्यता वर्तवण्यात आली आहे.