रत्नागिरी : प्रतिनिधी
तालुक्यातील ओरी येथे गोठ्यामध्ये मित्रांसोबत खेळताना पडल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. पारस प्रदीप घवाळी (12, ऱा ओरी, घवाळीवाडी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पारस हा ओरी येथे सोमवारी दुपारी गुरांच्या गोठ्यामध्ये मित्रांसोबत खेळत होता. यावेळी खेळता-खेळता खाली पडला. यावेळी त्याला उलटी झाल्याने मित्रांनी त्याला पाणी प्यायला दिले. यानंतर पारस हा आपल्या घरी आला होता . घरी आल्यानंतर पारस याला पून्हा अस्वस्थ वाटू लागले व तो अचानक बेशुद्ध झाला . यावेळी नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र जाकादेवी येथे दाखल केले.
पारस याची प्रकृती चितांजनक बनल्याने जाकादेवी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालय याठिकाणी जाण्याचा सल्ला दिल़ा त्यानुसार पारस याला रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता पारस याचा मृत्यू झाला . अशी नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आह़े