चिपळुणात घडला होता प्रकार, पाच वर्षांनंतर निकाल
चिपळूण : घरी कोणीही नसताना एकटेपणाचा गैरफायदा घेत अभिजीत गौतम जाधव (30) या नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना 11 मे 2018 रोजी घडली होती. याप्रकरणी या नराधमावर सावर्डे पोलीस स्थानकात पोस्कोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल पाच वर्षानंतर त्यास सोमवारी येथील विशेष न्यायाधीश एन. एस. मोमिन यांनी दोषी ठरवत 20 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
या पीडित अल्पवयीन मुलीची आई मुंबईला गेली होती, तर वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. याच संधीचा गैरफायदा घेत अभिजीत जाधव याने पीडित मुलीच्या घरी जाऊन तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार घडल्यानंतर याची माहिती त्या मुलीने त्याच्या चुलत काकीला दिली. त्यानुसार त्यांनी मुंबईवरून आईला बोलावून घेतले. तसेच दुसऱ्या दिवशी 12 मे रोजी पीडित मुलीच्या आईने सावर्डे पोलीस स्थानकात याबाबतची फिर्याद दिली होती. त्यानुसार याप्रकरणी अभिजीत याच्यावर पोस्को कायद्यांतर्गत दोषारोप पत्र ठेवण्यात आले होते. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे 10 साक्षीदार तपासण्यात आले.
सोमवारी पुराव्याअंती येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एन. एस. मोमिन यांनी अभिजीत याला दोषी ठरवत 20 वर्षे सक्त मजुरी आणि 25 हजार रूपये दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद तसेच भा.दं.वि. कलम 506 अन्वये 2 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. या दोन्ही शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. पुष्पराज शेट्ये यांनी काम पाहिले. या घटनेचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी केला होता. पैरवी अधिकारी म्हणून कांबळे व जानवलकर यांनी काम पाहिले.