राजापूर : वार्ताहर
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना कुवेशीतील जुने मूर्तीकार भालचंद्र लिंगायत यांचा आकस्मिक आरोग्याचा प्रश्न उद्भवल्याने एकवटलेल्या तालुक्यातील मूर्तीकारांनी त्यांच्या चित्रशाळेत जाऊन मूर्तीचे रेखणीचे काम पूर्ण करून दिले. संघटन व एकोपा याचे दर्शन घडवत राजापुरातील गणेश मूर्तीकारांनी आपल्या एका व्यावसायिक बंधूला कठीण काळात मदतीचा हात दिल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
आता गणेशोत्सव अवघ्या एका दिवसावर आला असताना गणेशमूर्तीशाळांमध्ये कामाची लगबग सुरू आहे. सद्यस्थितीत मूर्त्यांच्या रंगकामात सर्व मूर्तीकार व्यस्त असताना राजापूर तालुक्यातील कुवेशी येथील मूर्तीकार भालचंद्र लिंगायत यांना अर्धांगवायुचा झटका येऊन त्यांची एक बाजू निकामी झाली. त्यामुळे त्यांच्या मूर्तीशाळेतील मूर्ती रंगकाम खोळंबून पडले. मात्र ही बाब राजापूर तालुका मूर्तीकार संघटनेचे अध्यक्ष कैलास कोठारकर यांच्या कानी येताच समस्त मूर्तीकार एकवटले आणि त्यांनी कुवेशी येथे जाऊन लिंगायत यांच्या मूर्तीशाळेतील मूर्तीचे रेखणीचे काम करून दिले. लिंगायत यांचा मुलगा नीलेश याला कोणताही अनुभव नसताना त्याने या कामात मोठी मदत केली. तसेच लिंगायत यांना कठीण काळात राजापूर मूर्तीकार संघटनेचे पदाधिकारी मूर्तीकार कैलास कोठारकर, प्रकाश तांबट, अनंत आडविलकर, यशवंत मांडवकर, संजय नाटेकर, साईनाथ पड्यार आदींनी मदतीचा हात पुढे करून सहकार्य केले. असे सामाजिक उद्देश समोर ठेवून मूर्तीकारांनी एकजुट कायम ठेवली पाहिजे, असे आवाहन श्रीगणेश मूर्तीकार संघ राजापूरचे तालुकाध्यक्ष कैलास कोठारकर यांनी यावेळी केले