टाळसुरे वार्ताहर
दापोलीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून एकाच रात्रीत दोन मंदिरातील दानपेट्या फोडून त्यातील रोख रक्कम लंपास केली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दापोलीमधील वडाचाकोंड येथील महापुरुष मंदिर व जालगाव येथील श्रीराम विठ्ठल हनुमान मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांनी डला मारल्याची घटना शुक्रवारी रात्री 9.30 ते शनिवारी सकाळी 8.30 च्या सुमारास घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाचा कोंड येथील महापुरुष मंदिरात चोरट्याने मंदिरातील पैशाची दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम लंपास केली आहे. तेथूनच पुढे असणाऱ्या जालगाव येथील श्रीराम-विठ्ठल-हनुमान मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडून त्यातील रक्कम लंपास केली आहे. यामुळे चोरट्यांनी सध्या तालुक्यामधील मंदिरांकडे मोर्चा वळविल्याचे दिसत आहे. आंजर्ले-सावने येथील सावणेकरीन मंदिर फोडून तेथील सीसीटीव्ही व मशीन चोरट्यांनी लंपास केले होते. तसेच सुकोंडी येथील गणेश आंबे मंदिर फोडून तेथून 25 ते 30 हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. या घटना ताज्या असतानाच दापोली शहराकडे चोरट्यांनी मोर्चा वळविला असल्यामुळे चोरट्यांमध्ये कायदा-सुव्यवस्थेची कोणतीही भीती राहिली नसल्याचे बोलले जात आहे. दापोली परिसरात अशा चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वडाचा कोंड येथे महापुरुष मंदिरांमध्ये सीसीटीव्ही बसवल्याने चोरट्यांचा माग काढणे पोलिसांना सोयीचे होणार आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे माहिती घेऊन तपास सूत्रे हलवली जात असल्याचे समजते. दापोली परिसरातील मंदिरेही आत्ता सुरक्षित नसल्याचे या घटनांवरून पुन्हा एकदा समोर आले आहे या चोरी प्रकरणी दापोली पोलीस स्थानकात भादंवि 380, 454, 457 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास दापोलीचे पोलीस उपनिरीक्षक निनाद कांबळे करीत आहेत.