प्रतिनिधी/रत्नागिरी
रस्त्यावर मासे वाहतूक करणाऱ्या गाडीच्या सांडलेल्या पाण्यावरून सुमारे १० ते १२ वाहने घसरून अपघात घडल्याची घटना रविवारी सायंकाळी ७ वा. च्या सुमारास घडली.
रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर साळवीस्टाॅप येथे भंगार व्यावसायिकांच्या समोर हा अपघात घडला. रस्त्यावर सांडलेल्या पाण्यावरून ५ ते १० मिनिटांच्या कालावधीत धडाधड दुचाकी पडण्याच्या प्रकाराने सगळेच अचंबित झाले. अखेर पाणी सांडलेल्या भागात आडवे दगड टाकून हा रस्ता बंद करण्यात आला. यामुळे पुढील अपघात टळले.
रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथून फिशमिल तसेच इतर मासे भरून गाड्या एमआयडीसी येथील कंपनीत येत असतात. या गाड्यांमधून रस्त्यावर सांडणारे पाणी नेहमीच अपघातास कारणीभूत ठरत असते. या अपघातांच्या मालिकांमुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. त्याच बरोबर अनेकजण जखमी झालेत. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
तर येथूनच जवळ असलेल्या चंपक मैदानावर रत्नागिरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार असल्याने महोत्सवाला मोठी गर्दी होती. त्यामुळे कुटुंबासह महोत्सवात येणाऱ्यांची मोठी गर्दी होती. सुदैवाने अपघातांच्या मालिकांमुळे जीवीत हानी झाली नसल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
या मार्गावर नियमित मासे वाहतूक होत असते. या मासे वाहतूकीमुळे रस्त्यावर पाणी सांडण्याचे प्रकार नियमित होतात. त्यामुळे असे अपघात घडत असतात. मात्र संबंधित यंत्रणा या बाबतीत नेहमीच उदासीन दीसून आली आहे. अपघातांच्या या प्रकारामुळे स्थानिक तरुणांनी मासे वाहतूक रोखण्याचे काम केले होते. थोडे दिवस ही वाहतूक सुरक्षित उपाय योजना करून करण्यात येते मात्र कालांतराने पून्हा असुरक्षित वाहतूक सुरू होऊन अपघातांची मालिका सुरू होते. संबंधित यंत्रणेने या प्रकरणी कायमची उपाय योजना करून वाहन धारकांना सुरक्षा पुरवावी अशी मागणी होत आहे.