ऑनलाईन टीम / मुंबई :
भाजपकडून विरोधकांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे. पण आम्ही नैतिकता सांभाळत बसलो. त्यांना नैतिकता सांभाळता येत नसेल. तर आम्ही इकडे तिकडे पाहणार नाही. आम्हालाही कोथळा काढण्याचा अधिकार आहे, असा इशारा शिवसेना संजय राऊत (sanjay raut) यांनी दिला आहे.
शिवसैनिकांच्या सोशल मीडिया सेलच्या मेळाव्यात राऊत बोलत होते. ते म्हणाले, शिवसेना हा तरुण विचारांचा पक्ष आहे. गरम रक्ताची तरुण पिढी बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणात आणली. शिवसेना देशाच्या राजकारणातला सर्वात मोठा ब्रँड आहे. सेनेची ताकद आहे, ती कायम राहिल. महाराष्ट्रात शिवसेनेशी लढणं तितकं सोपं नाही. विरोधकांकडून शिवसेनेला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. आम्ही आतापर्यंत नैतिकता सांभाळली. पण त्यांना नैतिकता सांभाळता येत नसेल तर कोथळा काढण्याचा अधिकार आम्हाला आहे. मी रोज सकाळी मीडियाशी बोलतो, जर बोललो नाही तर पक्षाचा कार्यक्रम सेट होणार नाही. शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है. हम ना झुकेंगे, ना रुकेंगे.
यावेळी राऊत यांनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हिटलरला फॉलो करतात. हिटलरप्रमाणे मोदीही खूप इव्हेंट करतात. पण हिटलर आणि मोदींच्या प्रचारात खूप साम्य आहे. हिटलरच्या काळातही विरोधी पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. सुशांतसिंग राजपुत, कंगना राणावत प्रकरणात आमच्यावर खोटे आरोप करण्यात आले. महाराष्ट्रात शिवसेनेशी लढणं तितकं सोपं नाही. अंगावर येणाऱ्याला आम्ही डंम्पिंगमध्ये फेकून देणार. आपल्या चेहऱयावर तणाव दिसणं हा आपला पराभव आहे, असा टोलाही राऊत यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला.