अरबाज खानकडून चित्रपटाची घोषणा
अरबाज खानने दीर्घकाळानंतर स्वतःच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती त्याची कंपनी करणार आहे. ‘पटना शुक्ला’ असे नाव असलेल्या या चित्रपटात रविना टंडन मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे.
पटना शुक्ला या चित्रपटात रविनासोबत सतीश कौशिक, मानव विज, चंदन रॉय सान्याल, जतिन गोस्वामी आणि अनुष्का कौशिक हे कलाकार दिसून येणार आहेत. तर दिग्दर्शनाची जबाबदारी विवेक बुडाकोटी याच्याकडे असणार आहे. रविना या चित्रपटामुळे दीर्घकाळानंतर मोठय़ा पडद्यावर झळकणार आहे.
अरबाज खानकडून निर्माण होणारा हा पाचवा चित्रपट ठरणार आहे. अरबाजने 2010 मध्ये सलमान खानचा अत्यंत यशस्वी चित्रपट ‘दबंग’मधून निर्माता म्हणून काम सुरू केले होते. तसेच त्याने चित्रपटात अभिनय देखील केला होता. 2012 मध्ये प्रदर्शित दबंग 2 या चित्रपटाची निर्मिती करण्यासह अरबाजने याचे दिग्दर्शन देखील केले होते. तर ‘पटना शुक्ला’ एक सोशल ड्रामा चित्रपट आहे.
अरबाज याचबरोबर सोनी-लिव्हची वेबसीरिज ‘तणाव’मध्ये दिसून येणार आहे. ही सीरिज काश्मीरची पार्श्वभूमी दाखविणारी आहे. सुधीर मिश्रा यांनी याचे दिग्दर्शन पेले आहे.