ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर टीमचा खेळाडू राहिलेल्या विकास टोकस या क्रिकेटपटूला दिल्ली पोलिसांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या मारहाणीदरम्यान विकासचा डोळा थोडक्यात बचावला आहे. याप्रकरणी विकासने दिल्ली पोलीस मुख्यालयात तक्रार दाखल केली आहे.
विकासने तक्रारीत म्हटले आहे की, मी नॅशनल आणि आयपीएल क्रिकेटपटू आहे. 26 जानेवारीला भिकाजी कामा पोलीस स्टेशनमधील पोस्ट इंचार्जने माझ्याशी केलेला व्यवहार निंदनीय होता. त्या अधिकाऱ्याने मला बुक्की मारली. माझा डोळा निकामी होण्यापासून थोडक्यात बचावला आहे. या प्रकरणाची तुम्ही तातडीने दखल घ्यावी. कारण, या घटनेचा मला प्रचंड मानसिक त्रास होत आहे,’ असे विकासने म्हंटले आहे.
विकास 2016 मध्ये आयपीएल टीमचा भाग होता. पण, विकासला एकाही आयपीएल मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. विकासने 15 प्रथम श्रेणी आणि 17 टी-20 सामने खेळले आहेत.