नवी दिल्ली वृत्तसंस्था
कंगना राणावत या प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्रीने भाजपने तिकीट दिल्यास निवडणूक लण्याची तयारी दर्शविली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने आपले मनोगत व्यक्त केले. हिमाचल प्रदेशमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपची इच्छा असल्यास आपण उमेदवार म्हणून सहभागी होऊ शकतो, असे सुतोवाच राणावत यांनी केले.
आपल्याला राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा असून भारतीय जनता पक्ष हा आपल्या पसंतीचा पक्ष आहे. त्यामुळे या पक्षाच्या माध्यमातून राजकारणात कोणतीही जबाबदारी स्वीकारावयास आपण तयार आहोत. कठीण परिश्रम करण्यास आपण मागेपुढे पाहत नाही. चित्रपटसृष्टीत अनेक आव्हानांशी दोनहात करीत आपण यश मिळविले आहे. राजकारणातही कष्ट करून पुढे येण्याची आपली तयारी आहे. भाजपने संधी दिल्यास समाधान वाटेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
मविआशी पंगा
महाराष्ट्रात पूर्वी असलेल्या महाविकास आघाडी सरकारशी कंगना राणावतचे अनेकदा खटके उडालेले होते. आघाडी सरकारकडून तिच्या मुंबईतील घराचा कांही भागही पाडण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकारवर तिने अनेकदा कठोर टीका केली होती. तेव्हापासूनच तिच्या राजकारण प्रवेशाची प्रतीक्षा केली जात होती. तथापि तिने कधीही उघडपणे राजकारणात सहभाग घेण्याची इच्छा व्यक्त केली नव्हती. आता मात्र तिने स्पष्टपणे आपली महत्त्वाकांक्षा व्यक्त केली आहे.