वृत्तसंस्था/ मुंबई
भारताची रशियातून होणारी कच्च्या तेलाची आयात विक्रमी स्तरावर पोहचली असल्याची माहिती आहे. जी इराक व सऊदी अरबपेक्षाही अधिक असल्याचे बोलले जात आहे. फेबुवारी 2023 मध्ये आयात 35 टक्के अधिक राहिली आहे. फेबुवारीत भारताने रशियातून 16 लाख बॅरल प्रतिदिन इतके कच्चे तेल आयात केले असल्याची माहिती आहे. भारत जेवढय़ा मात्रेत कच्चे तेल आयात करतो त्याच्या एक तृतियांशपेक्षा अधिक पुरवठा एकटय़ा रशियाने केला आहे. सलग 5व्या महिन्यात पुरवठय़ासाठी भारत हा मोठा एकमेव देश रशियाकरीता ठरला आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये भारताचा रशियातील कच्च्या तेलाच्या आयातीतील वाटा 1 टक्कापेक्षा कमी होता पण फेबुवारी 2023 मध्ये हेच प्रमाण 35 टक्क्यावर पोहचले आहे. भारताला सध्या रशिया विक्रमी स्तरावर कच्च्या तेलाची निर्यात करतो. इराकने फेब्रुवारीत 9 लाख 39 हजार 921 बॅरल प्रतिदिन तर सऊदी अरबने 6 लाख 47 हजार 813 बॅरल प्रतिदिन तेलाचा पुरवठा केला आहे. गेल्या 16 महिन्यात या दोन देशांकडून सर्वात कमी कच्च्या तेलाचा पुरवठा राहिला आहे.