उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे गटविकास अधिकाऱ्यांना आदेश; दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश
कृष्णात चौगले कोल्हापूर
यवलूज (ता. पन्हाळा) ग्रामपंचायतमधील शासकीय योजनेतील निधीचा गैरवापर व अनियमित खर्चाची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल पन्हाळा पंचायत समितीकडून जि.प.ग्रामपंचायत विभागास सुमारे तीन वर्षापूर्वी सादर केला आहे. यामध्ये तत्कालिन सरपंच, उपसरपंचासह एकूण 13 सदस्य आणि 2 तत्कालिन ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून अपहार रकमेची वसुली करण्याची कार्यवाही करण्याचे नमूद होते. पण संबंधित गटविकास अधिकाऱयांनी त्यानुसार कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे दोषींकडून अपहार रक्कमेची वसूली करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांनी पन्हाळा गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.
यवलूज गावातील ग्रामस्थ आनंदराव पाचाकटे यांच्या तक्रार अर्जातील चौकशीनुसार शासकीय योजनेचा गैरवापर करणे, ग्रामपंचायत कडील मिळकत नोंदवही नमुना 8 मध्ये चुकीच्या व नियमबाह्य नोंदी घेणे. 2012-13 व 2013-14 या कालावधीत शासनाचे पर्यावरण समृध्द ग्राम संतुलीत योजनेअंतर्गत मूल्यांकनाशिवाय खर्च करणे. तसेच 13 व्या वित्त आयोग योजनेअंतर्गत मुल्यांकनाशिवाय खर्च करणे. आदेशाचे पालन न करणे, बजावण्यात आलेल्या नोटीशींचा खुलासा न करणे याचा समावेश आहे. यामध्ये 4,17,925 रुपये इतका खर्च हा प्रमाणक, पावतीशिवाय करणेत आला आहे. दरपत्रक मागणी न करता काम करणे, तसेच झालेला खर्च ग्रामपंचायत ठरावाने मान्यता घेतलेली नाही. तसेच कर कपाती केलेल्या दिसून येत नाहीत. कामाचे मोजमाप पुस्तिका लिहिलेली नाही. खरेदीखरेदी करण्यात आलेल्या साहित्याची नोंद साठानोंद वहित नोंदी घेतलेल्या नसून सर्व खर्च मुल्यांकनाशिवाय करणेत आलेला आहे. तो नियमबाह्य केल्याचा ठपकाही ग्रामसेवकांवर ठेवण्यात आला आहे.
तत्कालीन ग्रामसेवकांनी शासनाच्या पर्यावरण समृध्द ग्राम संतुलीत योजनेअंतर्गत मुल्यांकनाशिवाय खर्च करणे. 13 व्या वित्त आयोग योजनेअंतर्गत मुल्यांकनाशिवाय खर्च करणे. ग्रामपंचायतीकडील दुकानगाळे नियमबाह्य वाटप करणे. वरिष्ठ कार्यालयाचे आदेशाचे पालन न करणे, तसेच बजावण्यात आलेल्या नोटीसांचा खुलासा न करणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यांच्या कालावधीत 3,77185 रुपये इतका खर्च हा प्रमाणक, पावतीशिवाय करण्यात आला आहे. दरपत्रके मागणी न करता काम केलेले असून झालेला खर्च ग्रामपंचायत ठरावाने मान्यता घेतलेली नाही. कर कपाती करण्यात आलेल्या नाहीतकामाचे मोजमाप पुस्तिका लिहिलेली नाही. तसेच खरेदी करण्यात आलेल्या साहित्याची नोंद साठानोंद वहीत नोंदी घेतलेल्या नसून सर्व खर्च मूल्यांकनाशिवाय करण्यात आला आहे. तो नियमबाह्य असून शासकीय निधीचा गैरवापर करून खर्चाची अनियमितता झालेली असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
दोषींवर कारवाई करा
दरम्यान चौकशी अहवाल तयार असतानाही पन्हाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱयांनी गेल्या तीन वर्षात संबंधित दोषी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवकांवर कारवाई केली नसल्याची तक्रार पुन्हा आनंदराव पाचाकटे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांच्याकडे केली आहे. याची दखल घेत जाधव यांनी संबंधित सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य आणि दोन्ही ग्रामसेवकांकडून अपहाराची रक्कम वसूल करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश गटविकास अधिकाऱयांना दिले आहेत.