युक्रेनचे 4 भूभाग गिळंकृत करण्याचा प्रयत्न
वृत्तसंस्था / खेरसॉन
युक्रेनमधील डोनेट्स्क, लुहांस्क, खेरसॉन आणि जपोरिजिया या 4 हिश्श्यांना औपचारिक स्वरुपात स्वतःचा हिस्सा करण्यासाठी रशियाकडून तेथे जनमत चाचणी अंतर्गत मतदान सुरू करण्यात आले आहे. रशियात सामील व्हायचे की नाही? याचा निर्णय लोक याद्वारे घेणार आहेत. हे मतदान 5 दिवस म्हणजेच 27 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
पुतीन यांनी रशियाकडून बळकाविण्यात आलेल्या पूर्व आणि दक्षिण युक्रेनमधील या चार हिश्श्यांमध्ये जनमत चाचणी करविण्याची घोषणा केली होती. या भागांमध्ये रशियन वंशाच्या नागरिकांची संख्या तुलनेत अधिक आहे. या 4 भागांना रशियाने गिळंकृत केल्यास युक्रेनच्या आर्थिक नाडय़ा आवळल्या जाणार आहेत.
रशियाचे कथित निवडणूक अधिकारी जनमत चाचणीच्या पहिल्या चार दिवशी 23 ते 26 सप्टेंबरपर्यंत लोकांच्या घरी मतपत्रिका घेऊन पोहोचणार आहेत. याकरता नागरी भागातच मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. मतदानाच्या अखेरच्या दिवशी 27 सप्टेंबरला लोक मतदान केंद्रात जाऊन मतदान करू शकतील.
कब्जाची तयारी
24 फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धाला आता 7 महिने झाले आहेत. दोन्ही देश माघार घेण्यास तयार नसल्याने युद्ध सुरूच आहे. सप्टेंबर महिन्यात युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या कब्जातील 6 हजार चौरस किलोमीटरचा भूभाग मुक्त करविल्याचा दावा युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांनी केला आहे. रशियाने देखील आपले सैन्य मागे हटल्याचे मान्य केले आहे. तर जनमत चाचणीद्वारे रशिया युक्रेनचा भूभाग बळकावण्याच्या योजनेला वेग देत आहे. युक्रेनचे 4 भूभाग देशाच्या एकूण क्षेत्रफळातील 15 टक्के हिस्सा व्यापणारे आहेत.
राखीव सैनिकांचे पलायन
पुतीन यांनी युक्रेनच्या 4 भूभागांमध्ये 3 लाख राखीव सैनिक तैनात करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर राखीव सैनिक रशियातून पलायन करत आहेत. तर सैन्याचे कमांडर देखील राखीव सैनिकांना तैनात करण्याच्या मुद्दय़ावरून विभागले गेले आहेत. रशियाच्या अनेक शहरांमधील विमानतळ, बसस्थानक अन् रेल्वेस्थानकावर देश सोडणाऱया राखीव सैनिकांची गर्दी झाली आहे. यामुळे तिकिटांचे दर अनेक पटींनी वाढले आहेत. राखीव सैनिक फिनलंड, जॉर्जिया, मोन्टेनिग्रो आणि तुर्कियेमध्ये पलायन करत आहेत. या देशांमध्ये रशियाच्या नागरिकांना व्हिसाची गरज भासत नाही. फिनलंडने रशियन नागरिकांना रोखण्यासाठी सीमेवर 15 हजार अतिरिक्त सैनिक तैनात केले आहेत.