Anil Parad बृहन्मुंबई महापालिकेतील सहाय्यक अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी माजी परिवहन मंत्री अनिल परब आणि शिवसेना ठाकरे गटाच्या अन्य चार शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. वांद्रे पूर्वेतील शिवसेनेची शाखा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने उद्ध्वस्त केल्यामुळे अनिल परब आणि त्यांचे सहकारी आक्रमक झाले होते. बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो असलेले बॅनर या अधिकाऱ्यांनी कसे कसे काय काढले हे विचारण्यासाठी गेले असता ही घटना घडली.
या प्रकरणी अधिक माहीतीनुसार, बीएमसीचे अधिकारी केशव धोत्रे यांनी तक्रार दिली होती. यानुसार अनिल परब, सदा परब आणि पक्षाचे ४० हून अधिक कार्यकर्ते सोमवारी सांताक्रूझ पूर्व येथील एच पूर्व प्रभाग कार्यालयात घुसले होते. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता झाल्यानंतर त्यांनी वाकोला पोलिसांना कळवले होते.
सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान अनिल परब यांनी वांद्रे पूर्वेतील निर्मल नगर येथे त्यांच्या पक्षशाखेची तोडफोड कोणत्या अधिकाऱ्यांनी केली याची चौकशी केली. तसेच बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो का हटवण्यात आले. हे जाणून घेण्याची मागणी केली.
वाकोला पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीनुसार परब यांच्या दोघा कार्यकर्त्यांनी पाटील यांना मारहाण केली, तर इतरांनीही त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केली असल्याची तक्रार देण्यात आली आहे. परब यांनी घरातून बाहेर पडल्यास बेदम मारहाण केली जाईल, अशी धमकी पाटील यांना दिल्यानंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला.
अनिल परब यांच्यावर कलम 332 अन्वये लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी स्वेच्छेने दुखापत करणे, 353 नुसार लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी प्राणघातक हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करणे, 504 उल्लंघन करण्यास प्रवृत्त करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान अशी कलमे वाकोला पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.