शिंदे गटाकडे संपत्ती हस्तांतरित करण्याची मागणी फेटाळली
@वृत्तसंस्था / नवी दिल्ली
शिवसेनेची संपत्ती एकनाथ शिंदे गटाला हस्तांतरित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली आहे. शिवसेना पक्षाच्या संपत्तीचा अधिकार सध्या उद्धव ठाकरेंच्या गटाकडे आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायाधीश पी. एस. नरसिंह यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला याप्रकरणी तुमचा काय अधिकार असा सवाल करत याचिका फेटाळली आहे. शिवसेनेकडे सध्या 191.82 कोटी रुपयांची चल-अचल संपत्ती आहे. मुंबईतील शिवसेना भवनाचे नियंत्रण सध्या उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे आहे.
याचिका फेटाळली गेल्याने उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेना पक्षाची संपत्ती नव्या पक्षाध्यक्षाकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. मुंबईतील एक वकील आशिष गिरी यांनी स्वतःच्या याचिकेत ठाकरे गटाला पक्षनिधी अन्यत्र वळविण्यापासून रोखण्यासाठी निर्देश देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती.
याचिकेत उद्धव ठाकरे गटाकडे असलेल्या शिवसेनेची सर्व संपत्ती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात आली होती. ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली आहे. ही कशाप्रकारची याचिका आहे आणि ही याचिका दाखल करणारे तुम्ही कोण असा प्रश्न वकील आशिष यांना खंडपीठाने विचारला. तसेच खंडपीठाने ही याचिका विचार करण्यायोग्य नसल्याचे म्हणत ती फेटाळली आहे.
महाराष्ट्राचा मतदार म्हणून सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल करत आहे. शिवसेनेच्या संपत्तीशी निगिडत सर्व प्रश्नांची उत्तरे योग्य वेळेत मिळावीत. पक्षावरून पूर्ण स्थिती स्पष्ट व्हावी, जेणेकरून महाराष्ट्रात तामिळनाडूसारखी स्थिती होऊ नयेत असा युक्तिवाद याचिकाकर्त्याकडून करण्यात आला होता.
तामिळनाडूत जयललिता यांच्या निधनानंतर त्यांचा पक्ष अण्णाद्रमुकवरील नियंत्रणावरून दोन गट पडले हेते. पक्षाचा एक गट दिग्गज नेते ई. पलानिस्वामी यांच्यासोबत तर दुसरा गट ओ. पन्नीरसेल्वम यांच्यासोबत होता. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अण्णाद्रमुकची धुरा पूर्णपणे पलानिस्वामी यांच्या हातात गेली होती.