हलकर्णी ग्रा. पं.चे दुर्लक्ष; आठवड्यात कचरा न हटविल्यास वकील संघटनेकडून कारवाईचा इशारा
खानापूर : बेळगाव-खानापूर रस्त्यावर असलेल्या केएलई कॉलेज, न्यायालयासमोर, हलकर्णी, गांधीनगर, हुडको कॉलनी, समर्थनगर, जोरापुरे प्लॉट यासह अन्य वसाहतीतील लोक आपला कचरा या ठिकाणी टाकतात. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साठला असून यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याकडे हलकर्णी ग्राम पंचायतीने गेल्या काहीवर्षापासून दुर्लक्ष केल्याने खानापूर वकील संघटनेने हा कचरा येत्या आठ दिवसात हलविण्यात यावा, अन्यथा हलकर्णी ग्रा. पं. चे विकास अधिकारी आणि ग्रा. पं. च्या अधिकाऱ्यावर कारवाईचा इशारा दिला आहे.बेळगाव-खानापूर रस्त्यावर हलकर्णी ग्रा. पं. कार्यक्षेत्रात असलेल्या केएलई महाविद्यालय, न्यायालय आवार, मऱ्याम्मा मंदिर ही स्थळे आहेत. तसेच या रस्त्यालगत समर्थनगर, हुडको कॉलनी, गांधीनगर, जोरापुरे प्लॉट, हिंदूनगर यासारख्या नवीन वसाहती निर्माण झाल्या आहेत. बेळगाव-खानापूर रस्त्यालगतच या वसाहतीतील लोक आपला घरातील कचरा टाकत आहेत. त्यामुळे गेल्या काहीवर्षापासून या ठिकाणी कचरा टाकण्यात येत असल्याने मोठ्याप्रमाणात कचरा साठलेला आहे.
यामुळे या परिसरात अत्यंत दुर्गंधी पसरली असून यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. न्यायालयात कामकाजावेळी दुर्गंधीमुळे त्रास होत आहे. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही या दुर्गंधीमुळे शिक्षणात व्यत्यय येत आहे. तसेच या रस्त्यावरून प्रवास करतानाही दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी ही हलकर्णी ग्रामपंचायतीच्या विकास अधिकाऱ्यांना कचरा हटविण्यासंदर्भात वेळोवेळी सूचना करूनदेखील त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. शासनाकडून स्वच्छ अभियानंतर्गत कचऱ्याची विव्हेवाट लावण्यासाठी लाखो रु. चा निधी पंचायतीला देण्यात येतो. या निधीचा वापर हलकर्णी ग्राम पंचायतीकडून होत नसल्याने हा कचरा या ठिकाणी पडून आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. येत्या आठ दिवसात या ठिकाणच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यावी, तसेच पुन्हा या ठिकाणी कचरा टाकण्यास सक्त मनाई करण्यात यावी, अन्यथा हलकर्णी ग्रा. पं. च्या विकास अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा वकील संघटनेकडून देण्यात आला आहे. कचऱ्याही विल्हेवाट लावण्यासंदर्भात मागणी करण्यासाठी वकील संघटनेचे अध्यक्ष आय. आर. घाडी, अॅड. आनंद देसाई, गजानन देसाई, अॅड. बाळेकुंद्री, जेडीएस नेते रेवणसिद्धय्या हिरेमठ यासह अन्य वकील संघटनेचे सदस्य उपस्थित होते.