बेळगाव / प्रतिनिधी
निःस्वार्थ सेवेसाठी ओळखल्या जाणाऱया भारतीय सैन्याची परंपरा पुढे चालू ठेवत 17 राष्ट्रीय रायफल्स (मराठा लाईट इन्फंट्री) ने जम्मू काश्मीर येथील किश्तवाड येथे शोधमोहीम व बचावकार्य मोहीम राबविली. मचेल-पाडर या बर्फाच्छादित दुर्गम भागात राष्ट्रीय रायफल्सने शोधमोहीम राबवत प्रवाशाला वाचविले.
हंगेरी येथील 38 वषीय अकोस वर्मेस हे पर्यटनासाठी जम्मू काश्मीर येथे आले होते. परंतु हिमशिखरांच्या दुर्गम भागात ते अडकले. त्यामुळे त्यांच्या शोध मोहिमेसाठी राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी किश्तवाड परिसरात जमिनीसह अवकाशातून पाहणी करत त्यांचा शोध घेतला. पर्वतारोहण मोहिमेदरम्यान रस्ता चुकलेल्या आणि पाच दिवस प्रतिकूल हवामानाच्या संपर्कात राहिलेल्या प्रवाशांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली. त्यामुळे स्थानिक जिल्हा प्रशासन, हंगेरियन दूतावासाकडून भारतीय लष्कराचे व हवाई दलाचे कौतुक करण्यात आले.