विक्री 11 टक्के वाढली ः फाडा संघटनेची माहिती ः सणासुदीच्या कालावधीत वाहन खरेदीला पसंती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वाहन उत्पादकांकडून विक्रेत्यांना पुरवठा करण्यात येणाऱया साखळीत सुधारणा झाल्याने वाहनांच्या किरकोळ विक्रीत सप्टेंबरमध्ये 11 टक्के इतकी वाढ झाली आहे. गणेशचतुर्थीसह उत्सवी हंगामामुळे वाहन खरेदी गेल्या महिन्यात सुधारली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
ऑटो डिलर्स संघटना (फाडा)ने मंगळवारी सप्टेंबरच्या विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. यावेळी फाडाने सांगितले की, मागील महिन्यात एकूण किरकोळ विक्री 14,64,001 युनिट्सची होती, जी मागील वर्षी याच कालावधीत 13,19,647 युनिट्सची होती.
दसरा आणि दिवाळी या सणांमुळे या कालावधीत ग्राहकांची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने ऑक्टोबर महिन्यात किरकोळ विक्रीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता फाडाने व्यक्त केली आहे.
फाडाने दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यात प्रवासी वाहन विभागात गेल्या दशकातील सर्वोत्तम कामगिरी होईल अशी विक्रेत्यांना अपेक्षा आहे. वाहन विक्री सर्वोच्च पातळीवर पोहचण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही म्हटले आहे.
ट्रक्टर आणि तीन-चाकी वाहने वगळता इतर सर्व वाहन विभागांनी सप्टेंबर महिन्यात चांगली विक्री नोंदवली आहे. सप्टेंबर 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 2,37,502 वाहनांच्या तुलनेत प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री 10 टक्क्यांनी वाढून 2,60,556 युनिटवर पोहचली आहे. याचदरम्यान किया इंडियाने सप्टेंबरमध्ये 25 हजार 857 कार्सची विक्री केली असून ही आजवरची सर्वाधिक मानली जात आहे.
फाडाचे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘सेमीकंडक्टरचा पुरवठा सुधारल्याने ग्राहकांना वाहने खरेदीकरीता सहज उपलब्ध होत आहेत. याखेरीज आधुनिक वैशिष्टय़ांसह सुसज्ज नवीन मॉडेल्सची वाहने बाजारात दाखल होत असून यांना ग्राहकांची पसंती वाढताना दिसते आहे.
होंडा मोटारसायकलींची
एकूण विक्री 5,18,559 युनिट्सपर्यंत वाढली
होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाची एकूण विक्री सप्टेंबर 2022 मध्ये 7.6 टक्क्यांनी वाढून 5,18,559 युनिट्सवर पोहोचली आहे. यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कंपनीने मागील वर्षी याच महिन्यात 4,81,908 युनिट्सची विक्री केली होती. कंपनीची देशांतर्गत विक्री 5.44 टक्क्यांनी वाढून सप्टेंबरमध्ये 4,88,924 युनिट्सवर गेली आहे, जी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 4,63,683 युनिट्स होती.