प्रतिनिधी/ बेळगाव
रिक्षा चालक अनंत होसुरकर यांना अर्जुन जैन यांची अडीच लाख रुपयांची पैशांची बॅग सापडली. त्यांनी ती बॅग संबंधितास प्रामाणिकपणे परत केली. याबद्दल सेंट जोसेफ शाळेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. शनिवारी सकाळी 11 वाजता शाळेच्या सभागृहात मुख्याध्यापिका मेरी इब्राहिम व सेंट जोसेफ कॉन्व्हेंट शाळेचे माजी पीटीए सदस्य तसेच सुनील जाधव यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
अनंत होसुरकर हे सेंट जोसेफ शाळेची वर्दी करतात. त्यांना प्रवासादरम्यान रस्त्यावर पडलेली अडीच लाख रुपयांची पैशांची बॅग सापडली. त्यांनी ती पोलीस स्थानकामध्ये नेऊन दिली. इतकी मोठी रक्कम असूनही प्रामाणिकपणे रिक्षा चालकाने ती परत दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी सेंट जोसेफ कॉन्व्हेंट शाळेच्या मुख्याध्यापिका मेरी इब्राहिम म्हणाल्या, या धावत्या युगामध्ये पैशांच्या पाठिशी लागणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मिळालेली बॅग तर सोडाच हातातील पैशाची बॅग हिसकावून घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अशा परिस्थितीत प्रामाणिकपणे ही बॅग होसुरकर यांनी दिली, ही कौतुकास्पद बाब आहे. विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे प्रामाणिक राहून काम करावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी पीटीए उपाध्यक्ष संतोष गावडे, परवेझ किणीकर, सतीश कलघटगी, नाझनीन सौदागर, सोनाली खोत, पराग चंदगडकर, तौफीक सय्यद, इरफान मुल्ला यांच्यासह इतर शिक्षक व पालक उपस्थित होते.