टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने बुधवारी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर धावांचा अक्षरश: पाऊस पाडला. अवघ्या 63 चेंडूत रोहितने अफगाणिस्तानविरुद्ध आपले 31 वे वनडे शतक साकारले. या शतकी खेळीसह रोहित शर्मा विश्वचषक स्पर्धेत सर्वात जास्त शतके करणारा फलंदाज देखील ठरला. सचिन तेंडुलकरचा विक्रम त्याने मोडीत काढला. रोहितच्या वनडे विश्वचषक स्पर्धेच्या कारकिर्दीतील हे आतापर्यंतचे सातवे शतक ठरले. यासाठी त्याला अवघे 19 डाव खेळावे लागले. दुसरीकडे सचिन तेंडुलकरने वनडे विश्वचषकाच्या 44 डावांमध्ये 6 शतके केली आहेत. आता विश्वचषकात सर्वाधिक शतके करणाऱ्यांच्या यादीत रोहित पहिल्या तर सचिन दुसऱ्या स्थानावर आहे.
सोबतच विश्वचषकात सर्वात वेगवान शतक देखील रोहितच्या नावावर झाले आहे. अवघ्या 63 चेंडूत शतक करताच हा विक्रम त्याच्या नावावर झाला. यापूर्वी हा विक्रम कपिल देव यांच्या नावावर होता, त्यांनी 1983 विश्वचषकात अवघ्या 72 चेंडूंमध्ये शतक केले होते.
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक शतके झळकावणारे फलंदाज-
- रोहित शर्मा – 19 डावांत 7 शतके
- सचिन तेंडुलकर – 44 डावांत 6 शतके
- कुमार संगकारा – 35 डावांत 5 शतके
- रिकी पाँटिंग – 42 डावांत 5 शतके
- डेव्हिड वॉर्नर – 19 डावांत 4 शतके