Rohit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार(Sharad Pawar)यांची कोल्हापुरात शुक्रवारी 25 रोजी जाहीर सभा होत आहे. आजोबांची सभा यशस्वी करण्यासाठी शरद पवार यांचे नातू रोहित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दोन दिवस ते कोल्हापुरात ठाण मांडणार असून, याकाळात ते तालुकानिहाय बैठका घेणार आहेत. यामधून जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न पवार यांचा असणार आहे. आज कोल्हापुरात दाखल होताच रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.शाहू, फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार देशाला देण्यासाठी पवार साहेबांनी मुद्दामच दसरा चौक मैदान सभेसाठी निवडले असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.
यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की,पवार साहेबांनी मुद्दामच दसरा चौक मैदान सभेसाठी निवडले आहे.त्या मैदानातूनच शिव, शाहू, फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार देशाला द्यायचा आहे. विचारांची ताकद पवार साहेबांना महाराष्ट्राला सांगायची आहे. पवार साहेबांच्या सोबत जे निष्ठावंत कार्यकर्ते राहिलेत त्यांची ताकद आहे.ज्यांना सत्तेत राहायचे होते तेच सत्तेत गेले,पण खरे कार्यकर्ते साहेबांच्या सोबत राहिले.सभेला जागा कमी पडेल याचीच भीती आता वाटत आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली. जे कार्यकर्ते पवार साहेबांच्या सोबत शेवटपर्यंत राहिले त्यांनाच ताकद देण्याची गरज आहे,असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आमदार अजित पवार यांनी केलेल्या बंड्यानंतर दुफळी निर्माण झाली आहे. बंडानंतर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार शुक्रवारी प्रथमच कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. येथील दसरा चौक मैदानावर त्यांची जाहीर सभा होत आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आमदार हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी अजित पवार यांच्यासोबत गेल्याने शरद पवार गटासाठी येथील परिस्थिती आव्हानात्मक बनली आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीत पवार यांची होणारी सभा यशस्वी करण्यासाठी रोहित पवार सभेपूर्वी दोन दिवस अगोदर कोल्हापुरात दाखल झाले आहेत.
असा असेल रोहित पवार यांचा दोन दिवसांचा दौरा
आज सकाळी 11 वाजता ते गारगोटी येथे भुदरगड राधानगरी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. दुपारी 2 वाजता गडहिंग्लज येथे गडहिंग्लज,चंदगड, आजरा, सायंकाळी 6 वाजता इचलकरंजी येथे इचलकरंजी,हातकणंगले आणि शिरोळमधील पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. यानंतर 24 रोजी सकाळी नऊ वाजता ते करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतील. सकाळी 10:30 वाजता शहरातील शिवाजी स्टेडीयम येथील पक्षाच्या कार्यालयामध्ये ते प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत .त्यानंतर सकाळी 11 वाजता ते करवीर, कोल्हापूर शहर, गगनबावडा तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहेत.